Sangli Samachar

The Janshakti News

काँग्रेस शिवसेनेमधील खडाखडी संजय काकांच्या पथ्यावर !सांगली समाचार - दि. ३१ मार्च २०२४
सांगली - शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस, राज्यात अस्तित्वाच्या लढाईसाठी प्रयत्न करीत असताना, सांगलीच्या जागेवरून दोन्ही पक्षातील नेत्यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनवल्यामुळे अधिकच गुंता वाढत चालला आहे. सांगलीत विशाल पाटलांसाठी काँग्रेस आक्रमक होत असताना शेजारील कोल्हापुरात तिढा वाढला आहे. त्यामुळे काँग्रेसचे दिल्लीश्वर सांगलीच्या जागेवरून यू टर्न घेतात की काय ? अशी शंका व्यक्त होत आहे.

या साऱ्या पार्श्वभूमीवर संजय काकांची बाजू मात्र भक्कम बनत चालली आहे. कारण सांगलीत काँग्रेस की शिवसेना हा निर्णय होत नसल्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत दिसत आहेत. शिवसेनेचे पै. चंद्रहार पाटील प्रचाराला लागलेले असले, तरी त्यांच्या तांड्यात कार्यकर्त्यांची वाणवा जाणवत आहे. त्यांच्या पाठीमागे असलेल्या छुप्या शक्तीचे कार्यकर्ते उघडपणे प्रचारात भाग घेऊ शकत नाहीत. परिणामी याचा विपरीत परिणाम मतदारांच्या मानसिकतेवर होताना दिसत आहे. उलट संजय काकांबद्दल स्वपक्षीयात नाराजी दिसत असली तरी त्याचा परिणाम संपूर्ण मतदारसंघावर आढळून येत नाही, भाजपामधील ज्या भागातील दोन नेते संजय काकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत, तेथे प्रश्नचिन्ह असले तरी, या प्रश्न चिन्हावर 'त्यांची ताकद किती ?' असा प्रश्न उपस्थित होतो.


संजय काकांनी प्रचारात आघाडी घेतलेली असून त्यांची 'सोशल मीडिया टीम' काकांचा प्रचार जोमाने करीत आहे. तर स्वतः काका मतदार संघातील वजनदार नेते आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीवर भर देताना दिसत आहेत. आणि म्हणूनच कार्यकर्ते काकांच्या हॅट्रिकबद्दल ठाम आहेत. आगामी काळात काकांच्या विरोधात कोण ? येथील तिसरी शक्ती निवडणुकीत किती प्रभावी ठरते ? यावर विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालणार ? हे निवडणूक निकालानंतरच दिसून येईल. तोपर्यंत चर्चा तर होणारच...