Sangli Samachar

The Janshakti News

"राजा राणीची ग ही जोडी"; 'जनाचा संसार' वाढविण्यात यांना ग गोडी..



सांगली समाचार दि. १७ मार्च २०२४
सांगली - चंद्रकांत क्षीरसागर हे नाव माहिती नाही असा सांगलीत पत्रकार नसेल. ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत क्षीरसागर म्हणजे अखंड उत्साहाचा झरा. मैत्री करावी, जपावी आणि ती निभवण्यासाठी प्रसंगी झोकून द्यावे, त्यावेळी आपल्या खिशाचा किंवा त्यावर पडणाऱ्या ताणाचा विचारही न करावा तर तो त्यांनीच. सांगलीच्या पत्रकारितेत आज तरंगणाऱ्या अनेक नौका कधीच लोकांना माहितीही झाल्या नसत्या मात्र पुण्य नगरीचे आवृत्ती प्रमुख आणि ते दैनिक सांगलीत आणून व्यवस्थित रुजविणाऱ्या क्षीरसागर यांनी पत्रकारितेचा गंधही नसलेला पण राबू शकेल असा एक एक माणूस वेचून आणला, त्या कच्च्या गोळ्यांना पत्रकार म्हणून घडवले. त्यांना आर्थिकदृष्ट्या सबळ केले. काहींना तर पहिले काही पगार आपल्यासह इतरांच्या पगारातून थोडी थोडी रक्कम काढून देऊ केले. नंतर ते दैनिकाच्या पे रोलवर आले. अनेक गावात आणि तालुक्यात नव्याच लोकांना तालुका प्रतिनिधी आणि वार्ताहर म्हणून तयार केले. प्रसंगी त्यांच्या नावावर बातम्या आपणच लिहून काढल्या.

या दरम्यान चोख आर्थिक व्यवहार, उत्तम व्यवसायिक यश दैनिकाला मिळवून देऊन त्याचे भव्य असे कार्यालय उभे करून त्यांनी दैनिकाच्या मालकांच्या मनात स्वतःचे स्थानही निर्माण केले. आपल्या कार्यकक्षेच्या बाहेर जाऊनही दैनिकाला आणि मालकांना त्यांनी सहकार्य देऊ केले. त्याबद्दल कधी चकार शब्द काढला नाही. असे ऐन भरात आलेले दैनिक सोडून एकदिवस ते त्यातून मोकळेही झाले. हे सहज बाजूला होणे आणि कोणाबद्दलही मनात अढी न ठेवता जगता येणे, पत्रकारितेच्या क्षेत्रात खूपच अवघड. तसे पूर्वीही त्यांनी केलेले होते. दैनिकाच्या जबाबदारीपासून पत्रकार lसंघाच्या जबाबदारीपर्यंत सगळीकडे महत्वाच्या पदावर चांगली कामगिरी आणि तेजतर्रार कारकीर्द गाजवूनही सहज बाजूला होण्याची या माणसाची वृत्ती सलाम ठोकावा अशीच. कधीकाळी थेट राहुल बजाज यांना भेटून बजाजच्या पार्टसची एजंसी मिळवणे, त्यातून सांगलीतील मेकॅनिक मंडळींशी चांगले संबंध प्रस्थापित करणे, उत्तम व्यवसाय चालवणे असे पराक्रम त्यांनी केले आणि असेच सहज एक दिवस त्या सर्वावर पाणी सोडून मोकळे सुध्दा झाले. तिथली येणी तिथेच... देणी तेवढी डोक्यावर घेऊन कुठेही तक्रार न करता ते सगळे एकट्याने सोसले. या काळात भोवताली जमलेल्या भुतावळीला गुणदोषांसहीत त्यांनी स्वीकारले. त्यांच्या खाण्यापिण्यापासून कपडेलत्ते देऊन अशांनाही माणसात आणायचे प्रयत्न केले. (काहींचे शेपूट कायम वाकडेच राहिले, पण, काही संगतीने सुधारले.) ती जत्राही तिथेच सोडून यांची वेगळी वाटचाल सुरूच राहिली.


एका दैनिकाच्या प्रमुखपदावर असताना मागे उभी राहिलेली प्रभावळ माणसाला खूप वेगळी बनवते. काहींना माणसातून उठवते. सोबतचे तुच्छ वाटू लागतात. आपण कुणीतरी वेगळे या पृथ्वीवर अवतरलोय अशा आविर्भावात ते राहतात. माणसं जपण्यापेक्षा तोडतात. त्यांची भावना समजून घेत नाहीत. त्यांच्याबद्दल ममत्व दाखवत नाहीत. पण, चंद्रकांत क्षीरसागर यांना कधीही मी त्या आविर्भावात बघितले नाही. अनेकदा मारुती रोडने चालत घरी निघाले असताना माझ्या सारखा एखादा नवखा दिसला तर त्याचे लक्ष नसले तरी यांची हाक यायची.... काटकर.... आवाजाकडे लक्ष गेले की हसून हात उंचावलेला दिसायचा... चला... असे म्हणत गर्दीत ते पुढे चालत रहायचे.... हे सगळे या माणसाला जमते कस?, इतके सगळे त्रास सोसूनही हा माणूस इतका आनंदी राहतो कसा, या चेहऱ्यावर कधी दुःख कसे दिसत नाही आणि कपाळावर आठ्या कधीच कशा येत नाहीत? याचे आश्चर्य मला कायम होते.

पण त्यामागचे रहस्य मला अगदी अलीकडच्या काही वर्षांत समजले. आठ, नऊ वर्षे आधीपर्यंत हे पप्पांच्या बरोबरचे लोक म्हणून मी जरा सावरूनच असायचो. त्यात बहुतांश मंडळींना काका म्हणूनच बोलावत असल्याचा परिणाम, तो एक गॅप अनेकांशी वर्षानुवर्षे राहिलाय. पण, अलीकडच्या काही वर्षांत संपर्क वाढला तसे लक्षात आले, *या माणसाची पॉवरबँक याच्या घरात आहे. क्षीरसागर काकांच्या पत्नी सौ. सरोज चंद्रकांत क्षीरसागर!...

आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाला त्यांच्या सोबतच धिटाईने त्या सामोरे जात होत्या. नाही म्हंटले तरी पुरुषाच्या तडकाफडकी निर्णयाचे परिणाम त्याच्या कुटुंबाला सोसावे लागतात. (इतके तरी आता अनुभवाने समजू लागले आहे.) अशावेळी कोणाचीही बायको आहे त्या परिस्थितीला शरण जाण्याचाच सल्ला देईल. पत्रकाराला तर जगाचा सलाम घ्यायची इतकी सवय जडते की त्या वालयातच तो गुरफटून सबुरीचा सल्ला मनावर घेऊन, आहे त्या स्थितीत जगत राहतो. त्याची बंडखोरी फक्त त्याच्या बोलण्यापुरती आणि इतरांवर गुर्गुरण्यापुरती मर्यादीत होते. पण इथे असे झाले नाही. काकांनी ताड की फाड घेतलेले प्रत्येक निर्णय त्यांनी आणि त्यांच्या दोन मुलींनी स्वीकारले. त्यांना कायम साथ दिली. इचलकरंजीतील एका कर्तबगार नगराध्यक्षांच्या कन्येने एका पत्रकाराच्या अधांतरी संसाराला असे सहजपणे स्वीकारावे आणि प्रत्येकवेळी नव्या प्रयोगाच्या परिणामांचे चटके बसत असतानाही तक्रार न करता आपले घर सावरत, सांभाळत रहावे, हे इतके सहज सोपे नाही. त्यांनी ते करून दाखवले. दैनिकाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर क्षीरसागर काय करत होते? कसे जगत होते? याचा विचार करायची सवड ना मला होती ना माझ्या पिढीतल्या कुठल्या पत्रकाराला? (एकदा तो विचार करून पहावा. आयुष्य बदलेल) अध्येमध्ये सिनियर मंडळींच्या चर्चेत "चंदू" हे नाव ऐकू यायचे. पण, त्यांनीही कधी त्यांचे काय चालले असेल? याची विचारणा केली नाही. आपले दुःख कोणालाही न सांगता चंद्रकांत क्षीरसागर आणि सरोज क्षीरसागर जगत राहिले.

"सरोजचंद्र" अशी चंदकांत क्षीरसागर यांनी आपली स्वतःची सोशल मीडियावर ओळख बनवली आहे. दोन्ही मुलींच्या संसारातील आनंदाचे क्षण, त्यांच्या मुलांच्या प्रगतीत आपला आनंद शोधत त्यांनी आपल्या पुढच्या आयुष्याला हे दशकभर मर्यादित करून घेतले. पण लोकांच्या उपयोगात येण्याचे त्यांनी काम सुरूच ठेवले. आपले दुःख कुणापुढे न मांडता गेले दशकभर ते जगत राहिले. हे दशक अत्यंत अडचणीचे ठरले असते पण पत्नीच्या साथीने त्यांनी ते निभावले. सायकलवरून रोज मित्र, ओळखीच्या माणसांना भेटणे, जुन्या अधिकारी, राजकारणी मित्रांना एकत्र आणणे असे आनंदाने ते जगत राहिले. विनातक्रार! कारण पॉवर बँकेची साथ! पण भेटलेल्या कुणापुढे त्यांनी आपले दुःख मांडले नाही. गेल्या काही वर्षात राज्यभर जोडलेल्या मित्र परिवाराला जाऊन भेटणे, मुलासारखे मानलेल्या काहींच्या अडचणी सोडवण्यात वेळ खर्ची घालणे आणि ज्याला आपल्या कुटुंबाच्या दाखले काढण्यापासून मुलांच्या प्रवेशापर्यंत ज्या अडचणी येतील तिथे ते काम आपल्या हाती घेऊन त्याला निवांत करण्याची जबाबदारी त्यांनी स्वखुशीने पार पाडली. अनेक सरकारी कार्यालयात पत्रकाराला गोड बोलून रांगेत उभा केलेले दिसते. पण तिथे चंद्रकांत क्षीरसागर यांची एक गोड विनंती त्या पत्रकाराची रांगेतून सुटका करणारी ठरते.

अलीकडेच एका वात्रटीकाकाराच्या दमा, क्षयाच्या त्रासाची त्याने यांना फोनवर माहिती दिली. मला वाचवा असेच तो त्यांना फोनवर म्हणत होता. त्याला रिक्षातून एका मोठ्या दवाखान्यात नेऊन "या माणसाला आपण वाचवायचे आहे" असा आग्रह त्यांनी एका मोठ्या डॉकटरना केला. त्यांनीही महिनाभर आयसीयू मध्ये फक्त क्षीरसागर यांनी टाकलेला शब्द झेलयचा म्हणून मोफत उपचार करून बरा केला. त्याच्यासाठी औषधे तपासण्या असा इतर लाखभरचा खर्च होणार होता. त्यातली बहुतांश रक्कम त्यांनी स्वतःची पत्रकार सन्मान निधीच्या महिन्याला मिळणाऱ्या रकमेतून खर्च केली. वर्षभर साठवलेली सगळी रक्कम संपली तेव्हा काही मित्रांना मदत करायला लावून त्या व्यक्तीला दोन महिन्यांची औषधे देऊन घरी पोहचवले. या दरम्यान घरून त्याला खायला नेण्यापासून तासन तास बसून राहण्यापर्यंत सगळे केले.

माझ्या पुण्याचा घडा अशा कामाने भरतो. कोणी आभार मानून माझे पुण्य कमी करू नये असे ते बोलून जातात. अलीकडे राज्यात अनेक दौऱ्यात मी, ते आणि प्रत्येकवेळी आमचे वेगवेगळे सहकारी पत्रकार मित्र खूप फिरलो. या दरम्यान हा माणूस उलगडत गेला. दुःख मनात साठवून फकत आनंद जगाला देत त्यांचे जगणे सुरू आहे. अलीकडे पत्नी सोबत त्यांनी देवदर्शन यात्रा केली. त्यांच्यासाठी खूप वर्षांनी असे काही त्यांनी केले. पण, त्यातही त्यांना खूप समाधान वाटले. पती विषयी अभिमान आणि त्याच्या स्वाभिमानाला, मानी स्वभावाला ठोकर लागणार नाही असे जपत त्यांनी चंद्रकांत क्षीरसागर या जिंदादील माणसाला तंदुरुस्त ठेवले आहे.

गेल्याच महिन्यात नांदेड जिल्ह्यातील माहूरगडच्या रेणुका देवी मंदिराच्या पायऱ्या काका ज्या गतीने चढले ते पाहून मी प्रवीण शिंदे आणि मोहन राजमाने थक्क झालो. इतके फिरून पुढे अनसुयेच्या पर्वतावर दर्शनाला जायची इच्छा ते व्यक्त करत होते आणि आम्ही तिघे आश्चर्याने एकमेकाकडे बघत होतो. आयुष्यात अनेक आव्हाने पेलताना शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्त राहणे सर्वांना जमते असे नाही. चंद्रकांत क्षीरसागर यांना हे जमते. कारण, हा चंद्र शांतपणे तळपत राहिला पाहिजे याची काळजी घेणारे एक "सरोज" त्यांना लाभले आहे.

आयुष्यात जे मिळाले त्यात समाधान आणि जे नाही मिळाले किंवा मिळूनही हातून गेले ते आपले नव्हतेच अशा वृत्तीने त्या जगत आहेत. माहेरच्या मोठ्या संपत्तीचा मोह सुध्दा न करता आपल्या भावांच्या पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी त्यांनी कोट्यवधीच्या संपत्तीवरचा हक्क सुध्दा सहज सोडला आणि आपले माहेर जपले. पती आणि दोन मुलींचा बहरता संसार हीच आपली संपत्ती मानून सदैव हसतमुख राहून त्यांनी सर्व संकटे पेलली. काका त्यांच्या लग्नाला युती म्हणतात. आज त्या युतीला ४१ वर्षे होत आहेत. ४१ वर्षांचा हा सुखी समाधानी संसार असाच बहरत राहो.... याच त्यांना शुभेच्छा आणि तुमच्या दोघांसारखे आयुष्य जगण्याची उर्मी आमच्या मनातही निर्माण होवो, अशा आशिर्वादाचे या जोडीकडे विनम्र मागणे....

(_हा मजकूर लिहून झाला तेव्हा योगायोगाने रेडीओवर साधी माणसं चित्रपटातील ऐरणीच्या देवा.... हे गाणं लागलं होतं. काका रोज सकाळी एक प्रसन्न गाणे मला पाठवतात. आज त्यांच्या आयुष्याशी जोडून असलेलं हे ऐरणीच्या देवा.... हे गाणं लागलं त्यावर फार काही लिहीत नाही फक्त वाचून झाल्यावर ते गाणं एकदा ऐका अशी लिवणाऱ्याची वाचणाऱ्यास विनंती._)

शिवराज काटकर, सांगली.