Sangli Samachar

The Janshakti News

सामाजिक हितासाठी आचार्यश्रींच्या विचारांचे चिंतन होणे आवश्यक - पूज्य जिनसेन भट्टारक :सांगली समाचार - दि. ५ मार्च २०२४
सांगली - आगम ग्रंथामध्ये आणि पूर्वाचार्यांनी सांगीतलेल्या परंपरेचे पालन केल्यास समाजामध्ये एकी निर्माण होईल, पूजा पद्धती आदीबाबत नाहक वाद न होता समाजहित साध्य होईल, अशी भावना नांदणी मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजींनी मांडली.
दक्षिण भारत जैन सभने आयोजित केलेल्या येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात प्रथमाचार्य प.पू. 108 श्री शांतिसागरजी महाराज आचार्यत्व पदारोहण शताद्बी महोत्सव वर्षानिमित्त संगोष्ठी संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्री रावसाहेब आ. पाटील (दादा) होते. व्यासपीठावर केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब जि.पाटील, शताद्बी समिती सांगलीविभागाचे अध्यक्ष शशिकांत राजेबा, खजिनदार संजय शेटे, सहखजिनदार अरविंद मजलेकर, ट्रस्टी जयपाल चिंचवाडे, महामंत्री प्रा. एन. डी. बिरनाळे व सौ.कमल मिणचे, माजी केंद्रीय उपाध्यक्ष प्रा.डी.ए.पाटील होते. 


अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये रावसाहेब आ. पाटील यांनी समाजातील विविध घटनांचा मागोवा घेत देवी-देवता, मुनी वर्ग, मठसंस्था, पूजा पद्धती इ.विषयी उत्तर व दक्षिण भारतामध्ये मत मतांतरे आहेत. समाजासमोर अशा प्रश्नांमुळे समाज संस्थांची व घटकांची कोंडी होत असून याबाबत एकवाक्यता होण्यासाठी समाजातील तज्ञ मंडळींची व मठसंस्था मिळून निर्णय घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावर भट्टारक जिनसेन महास्वामीजी म्हणाले, प्रत्येक जिनमंदिरामध्ये योग्य नियमावली व्हावी, ट्रस्टींनी आणि श्रावकांनी सजग होवून पूर्वाचार्यांनी सांगितलेल्या विचारावर चिंतन व आगमोक्त ग्रंथांचे स्वाध्याय जरूर करावे असे आवाहन केले. यावर जरूर विचार मंथन होत आहे ही बाब चांगली असून त्यातून समाजाचे व्यापक हित होईल अशी अपेक्षा करूया.
यावेळी मुख्यमहामंत्री डॉ.अजित पाटील यांनी ‌‘आचार्य पदाचे श्रेष्ठत्व' तर आचार्यत्व शताद्बी समितीचे समन्वयक डॉ. चंद्रकांत चौगुले यांनी ‌‘आचार्यश्रींचे जीवन दर्शन' या विषयावर सविस्तर संवाद साधला. शताद्बी समितीचे अध्यक्ष शशिकांत राजोबा यांनी स्वागत केले. तर प्रा.एन.डी.बिरनाळे यांनी आभार मानले. सविंद्र पाटील व प्रदीप मगदूम यांनी निवेदन केले.