Sangli Samachar

The Janshakti News

रिक्षा टॅक्सी चालकांचे होणार 'कल्याण' शासन निर्णय जारी !सांगली समाचार - दि. २६ मार्च २०२४
मुंबई - केंद्र आणि राज्य शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ ऑटो-रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालकांना घेता यावा म्हणून महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. या अंतर्गत राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय मंडळ असून, यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाचे मुख्यालय मुंबईत असणार आहे. राज्यस्तरीय कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष परिवहन मंत्री, सदस्य राज्य परिवहन आयुक्त, अशासकीय सदस्य नोंदणीकृत ऑटो-रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक संघटनेचे दोन सदस्य आणि सदस्य सचिव राज्य सह/अपर परिवहन आयुक्त असणार आहेत. जिल्हास्तरीय कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष संबंधित जिल्हाधिकारी, सदस्य वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त / अपर पोलिस अधीक्षक, सदस्य प्रादेशिक परिवहन अधिकारी-उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अशासकीय सदस्य नोंदणीकृत ऑटो-रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक संघटनेचे प्रतिनिधी तर सदस्य सचिव सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी असतील.


५० कोटी अनुदान -

कल्याणकारी मंडळ स्वायत्त आणि स्वयंपूर्ण व्हावे यासाठी शासनाकडून ५० कोटी रुपये अनुदान दिले जाईल. तर मंडळाच्या कामाची नियमावली स्वतंत्रपणे काढली जाणार आहे

कोणत्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार ?

१) जीवन विमा व अपंगत्व विमा योजना

२) आरोग्य विषयक लाभ

३) कामावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना (५० हजार)

४) कामगार कौशल्य वृद्धी योजना

यासाठी होणार मंडळ स्थापन -

राज्यातील ऑटो-रिक्षा, मीटर्ड टॅक्सीची नोंदणी, बॅच वितरण, निरीक्षण, तपासणी व कर भरणा परिवहन खात्यामार्फत केला जातो. त्यामुळे ऑटो-रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालकांची अद्ययावत माहिती परिवहन विभागाकडे उपलब्ध असते. त्यामुळे परिवहन विभागांतर्गत ऑटो-रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येणार होते.