Sangli Samachar

The Janshakti News

सिद्धार्थ जाधवचं नशीब फळफळलं, 'या' हॉलिवूड सिनेमात साकारणार भूमिका



सांगली समाचार - दि. २४ मार्च २०२४
मुंबई - आज काल कलाकार हे वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधील चित्रपटात काम करताना दिसतात. कधी बॉलिवूडमधील कलाकार हॉलिवूडमध्ये दिसतात, तर काही मराठीतील बॉलिवूडमध्ये. सतत कलाकारांना वेगवेगळ्या संधी येत असतात. आता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक असा अभिनेता आहे ज्याला थेट हॉलिवूड चित्रपटाची ऑफर आली आहे. चाहत्यांना आता या अभिनेत्याच्या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव हा लवकरच परितोष पेंटर यांच्या हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव 'द डिफेक्टिव्ह डिटेक्टिव्हज' असे आहे. हा चित्रपट ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांना सिद्धूच्या या चित्रपटाची आतुरता लागली आहे.

सिद्धार्थने 'द डिफेक्टिव्ह डिटेक्टिव्हज' या चित्रपटाविषयी बोलताना 'एबीपी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तो म्हणाला, 'या चित्रपटाचे सगळे श्रेय द डिफेक्टिव्ह डिटेक्टिव्ह दिग्दर्शक परितोष पेंटर यांना जाते. मी त्यांच्यासोबत यापूर्वी लोचा झाला रे या चित्रपटात काम केले होते. परितोष पेंटर यांनी गुजराती आणि हिंदी इंडस्ट्री गाजवली आहे. त्यांनी अफलातून, थ्री चिअर्स आणि 'द डिफेक्टिव्ह डिटेक्टिव्हज' असे तीन वेगवेगळ्या भाषेत चित्रपट बनवले आहेत. एकच विनोदी कथा तीन वेगळ्या प्रकारे सादर करण्यात अनोखी मजा आहे. मी या चित्रपटासाठी उत्सुक आहे.'


पुढे तो म्हणाला, ''द डिफेक्टिव्ह डिटेक्टिव्हज' या चित्रपटाची कथा ही आंधळा, बहिरा आणि मुका या तीन मित्रांभोवती फिरते. माझ्यासाठी या चित्रपटात काम करणे अतिशय वेगळा अनुभव होता. श्वेता गुलाटी, जॉनी लीव्हर, भरत दाभोळकर, तेजस्विनी लोनारी, परितोष पेंटर, जयेश ठक्कर हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. पहिल्यांदाच मी एका इंग्रजी चित्रपटात काम करणार आहे.'