Sangli Samachar

The Janshakti News

नव्या वादग्रस्त वक्तव्याने अजित दादा पुन्हा अडचणीत येणार ?सांगली समाचार - दि. १६ मार्च २०२४
बारामती - वादग्रस्त वक्तव्य आणि अजित दादा यांचा जणू समीकरणच बनलेला आहे आपल्या अनेक वक्तव्याने यापूर्वी अजित पवार हे अडचणीत आलेले आहेत नुकत्याच बारामती येथे केलेल्या काही वक्तव्याने पुन्हा एकदा त्यांच्या भोवती वादाचे वादळ घोंगावण्याचे चिन्ह निर्माण झालेले आहेत.

काय म्हटलेय अजित पवारांनी

ओळखीच्या माणसाला मोक्का लागत होता. मला नंतर सर्वांनी सांगितलं दादा त्याला वाचवा. मी म्हणालो, याचवेळी हे होणार. परत चुकला तर अजित पवारांकडे त्या कामासाठी यायचं नाही. मला अधिकारी म्हणतात दादा तुम्ही एवढं कडक वागता, मग यांना कसे पाठिशी घालता. माझा पण कमीपणा होतो. जीवाभावाची माणसं म्हणून माझीही थोडी अडचण होते. तसं आता कुणीच होऊन देऊ नका. तुम्ही चुकीचं वागू नका, योग्य वागा आणि चांगलं काम करा, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ते निरावागजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभेत बोलत होते. मोक्का लागणाऱ्या कार्यकर्त्याला वाचवण्याच्या विधानानंतर अजित पवार अडचणीत येऊ शकतात, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि शरद पवार गटाच्या नेत्या सक्षणा सलगर यांनी अजित पवारांवर सडकून टीका केलीय.


बारामतीत एका माणसाचं नाव सांगा की, दादगिरी करतो, बघतोच त्याच्याकडे. सर्वांनाच सारखा न्याय मिळाला पाहिजे. दादागिरी गुंडगिरी आता चालणार नाही, असा इशाराही पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिला. बारामतीतील जुन्या मंडईत उभारण्यात येणाऱ्या एक कॉम्पेक्सची माहिती अजित पवार या सभेत देत होते. यावेळी त्यांनी जुन्या भाजी मंडईतील दादागिरीचा किस्सा सांगितला. निरावागजचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते (नाना) यांचा एक किस्सा पवार यांनी सांगितला. परंतु, मोक्का लागलेल्या माणसाला वाचवण्याच्या वक्तव्यामुळं ते अडचणीत येऊ शकतात, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.


अजित पवार यांच्या भूमिकेवर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लोकशाहीला प्रतिक्रिया दिलीय, अजित पवार यांच्यावर टीका करताना अंधारे म्हणाल्या, "हे प्रचंड गंभीर आहे. कायदा सुव्यवस्था आणि प्रशासन सांभाळण्याची जबाबदारी जबाबदारी सरकारची आहे. पण सरकारमधील उपमुख्यमंत्री पदावरची अत्यंत जबाबदार व्यक्ती इतक्या बेजबाबदार पद्धतीने वक्तव्य करत असेल, तर हे गंभीर आहे. आमचं सरकार आहे, तर आम्ही मोठ्यातल्या मोठ्या गुंडाला वाचवू आणि आमचा विरोधक असेल तर सज्जनातल्या सज्जन माणसाला आम्ही त्रास देऊ. या सर्व गोष्टीमध्ये लोकांमध्ये त्यांची प्रतिमा काय होते, याचा त्यांनी विचार करायला पाहिजे.

सत्ताधाऱ्यांचे आमदार आणि त्यांचे पुत्र वेगवेगळ्या गुंडांसोबत फोटो आणि भेटीगाठी हे चित्र म्हणजे गुन्हेगारीचं उदात्तीकरणच आहे. असे फोटो व्हायरल झाल्यानंतर समाजातल्या इतर लोकांनाही वाटणार की, आपण सुद्धा असच वाटलं पाहिजे का? सत्ताधारी लोक गुंडांचं उदात्तीकरण करून चुकीचा मेसेज करत आहेत. सभ्य सुसंस्कृत ओळखला जाणारा महाराष्ट्र शिंदे फडवीसांच्या गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकतोय का? अशी परिस्थिती आहे. कदाचित हेच कारण असेल की, आमदार सुनील कांबळे यांनी अजित दादांच्या समोरच कार्यकर्त्याला मारहाण केली. पण दादा काहीच बोलू शकले नाहीत."

तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या नेत्या सक्षणा सलगर यांनीही लोकशाहीला प्रतिक्रिया दिली, त्या म्हणाल्या, जेव्हापासून अजित दादांनी शरद पवार साहेबांसोबत फराकत घेतलेली आहे. अजित दादा पार्ट २ नावाचा पिक्चर सुरु झाला आहे. पार्ट वनमध्ये अजितदादा बाहुबली होते, पण पार्ट टू मध्ये ते भल्लाळ देव झाले आहेत. नैतिकता नावाची गोष्टच अजित दादांकडे शिल्लक राहिली नाही. कालपर्यंत त्यांच्याकडचे आमदार फार भारी होते. ते आमदार किती कर्तबगार होते. काल दादा शहाणपण सांगत होते, की निलेश लंके तिकडे जातोय, तर त्याला राजीनामा द्यावा लागेल. पक्षांतरबंदी कायदा आहे.

मग २ जुलै २०२३ रोजी काय होतं. गद्दारी करून शरद पवार साहेबांना त्रास देताना हे आठवलं नाही का? तुमच्याकडे असलं की बाळ आणि दुसऱ्याकडे असलं की कारटा, हा न्याय असू शकत नाही. हे अजित दादांना शोभत नाही. तुम्ही शरद पवार साहेबांसोबत होता तेव्हा तुम्ही दादा होता आता भाजपच्या ताटाखालचे मांजर झाले आहात", असं म्हणत सलगर यांनी अजित पवारांवर टीका केली.