Sangli Samachar

The Janshakti News

कृष्णा नदी अखंडित वाहती ठेवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना; कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक



सांगली समाचार - दि. १६ मार्च २०२४
सांगली - कोयना धरणामध्ये सांगली जिल्ह्याच्या हक्काचे ४७.५ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. टंचाई काळासाठी म्हणून वीजनिर्मितीमधील १२ टीएमसी पाणी सांगली जिल्ह्यासाठी मिळावे, अशी जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. कोयना धरणात मुबलक पाणी असतानाही कृष्णा नदी कोरडी पडण्याचे कारण काय, असा सवालही सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला. यापुढे कृष्णा नदी अखंडित वाहती राहिली पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कृष्णा नदी वारंवार कोरडी पडत असल्याबद्दल कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे समन्वयक सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार यांनी सांगलीत पालकमंत्री सुरेश खाडे यांची भेट घेतली. यावेळी खाडे बोलत होते. ते पुढे म्हणाले, औद्योगिक क्षेत्रातही पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोयना, वारणासह सर्व धरणांमध्ये वीजनिर्मितीसाठी आवश्यक तेवढे पाणी ठेवूनही कृष्णा नदीत पाणी सोडण्याच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात निवेदन देऊन चर्चा केली आहे. वीजनिर्मितीमधील १२ टीएमसी पाणी सांगली जिल्ह्याला देण्याची मागणी केली आहे. पण, सांगली जिल्ह्याच्या वाट्यातील ४७.५ टीएमसी पाण्याचा पूर्ण वापर केला नाही. सांगली जिल्ह्याच्या हक्काचे ते सर्व पाणी वापरल्यानंतर जादा १२ टीएमसी पाणी मिळणार आहे. कुठेही जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.


पाण्यासाठी नागरिकांचे हाल

जलसंपदा विभाग कोयना, वारणा आदी धरणांतून वीजनिर्मितीचे कारण पुढे करून पुरेसे पाणी नदीत सोडत नाहीत. त्यामुळे या नद्यांच्या काठावरील सर्व रब्बी पिके धोक्यात आली आहेत. नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. औद्योगिक क्षेत्रातही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही अधिकारी पाणी व्यवस्थापन गांभीर्याने करत नाहीत. सातारा जिल्ह्यातील नेते पाण्याचे राजकारण करत आहेत, असा आरोप पूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, विजयकुमार दिवाण यांनी केला.