Sangli Samachar

The Janshakti News

आमदार काँग्रेसचा, उमेदवारी शिवसेनेकडून, पुढाकार भाजपचा; अन् आता भाजप नेते गायब !


सांगली समाचार - दि. ३१ मार्च २०२३

रामटेक  - महायुतीचे रामटेकचे उमेदवार राजू पारवे काँग्रेसचे उमरेडचे आमदार आहेत. त्यांना भाजपने गळाला लावले आणि रामटेकमधून लढवण्याची पूर्ण तयारी केली. त्यासाठी भाजप नेत्यांनी महायुतीमध्ये शिंदे सेनेकडे असलेला रामटेक मतदारसंघ आपल्याकडे घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण एकनाथ शिंदे शेवटपर्यंत मानले नाहीत.शेवटी पारवेंचा शिवसेनेत प्रवेश करवून त्यांना लढवण्यात येत आहे. ही बाब भाजपचे अनेक नेते, कार्यकर्त्यांना पटलेली नाही.


रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीने काँग्रेसचा उमेदवार आयात केल्याने भाजपचे अनेक इच्छुक उमेदवार अद्यापही नाराज आहेत. पाच वर्षे भाजपकरिता काम करायचे आणि निवडणुकीत दुसऱ्यासाठी मतदान मागायचे, हे पटले नसल्याने अनेकांनी रामटेकमधून अंग चोरून घेतले असल्याचे समजते.

महायुतीमध्ये रामटेक मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात आला आहे. सुमारे 25 वर्षांपासून हा मतदारसंघ सेनेकडेच आहे. यावेळी तो मिळवण्याची संधी भाजपला होती. भाजपच्या नेत्यांनीही शेवटपर्यंत प्रयत्न केला होता. येथील वाटाघाटी आणि हालचाली बघून भाजपच्या अनेक इच्छुकांच्या निवडणूक लढण्याच्या इच्छा जागृत झाल्या होत्या. अनेकांनी नेत्यांमार्फत फिल्डिंगही लावली होती. काहींनी अप्रत्यक्षपणे भेटीगाठींचे सत्र सुरू करून प्रचाराला सुरुवातदेखील केली होती.

उमरेड विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना भाजपमध्ये आणण्याच्या हालचाली आधीपासूनच सुरू होत्या. यास भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आपापल्या परीने विरोधही करीत होते. शेवटी हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याचा निर्णय झाला. राजू पारवे यांना सेनेत पाठवून महायुतीचे उमेदवार करण्यात आले. त्यामुळे भाजपचे निष्ठावंत चांगलेच नाराज झाले आहेत. पारवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला, त्या दिवसापासूनच अनेकांनी रामटेक सोडले.

काही कार्यकर्ते पिकनिकला निघून गेल्याचे समजते. काही फोनवर उपलब्ध असले तर रामटेकमध्ये दिसत नाहीत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी (ता. 28) बोलावलेल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला अनेकांनी दांडी मारून आपली नाराजी दर्शवल्याचे समजते. त्यांची नाराजी किती दिवस टिकून राहाते, भाजपचे नेते त्यांची कशी समजूत घालतात, हे लवकरच स्पष्ट होईल. तोपर्यंत मात्र भाजपत अस्वस्थता कायम राहणार, असे दिसते.

शंकर चहांदे हे भाजपचे कट्टर कार्यकर्ते आहेत. जिल्हा परिषद सदस्य, कामठी नगर परिषदेचे ते अध्यक्ष होते. भाजपमध्ये तिकीट मिळणे अवघड असल्याचे बघून त्यांनी वंचित बहुजन विकास आघाडीकडून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदू दलित व बौद्ध यांच्यात रामटेकच्या उमेदवारीवरून सुप्त संघर्ष सुरू आहे. हे बघता चहांदे नेमके कुणाची मते घेणार, याविषयी वेगवेगळे तर्क लावल्या जात आहेत.