yuva MAharashtra 25 लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांवर उषःकाल हॉस्पिटल कडून पोलिसात तक्रार

25 लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांवर उषःकाल हॉस्पिटल कडून पोलिसात तक्रार



सांगली समाचार - दि. ३० मार्च
सांगली - येथील उषःकाल मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या व अनेक व्याधीने गंभीर आजारी असलेल्या रुग्ण श्रीमती शकुंतला सूर्यकांत शहा यांना त्यांचा मुलगा राहुल शहा, सून संपदा शहा व नातू यश शहा यांनी हॉस्पिटलची बिल चुकवण्याच्या उद्देशाने हॉस्पिटल सुरक्षा यंत्रणेला गुंगारा देत दमदाटी करीत पेशंटला पळवून नेण्याचा प्रकार नुकताच घडला आहे. तसेच राहुल शहा यांनी कांगावा करत स्वतःच पोलिसात खोटी तक्रार दिली. त्यानंतर ही फिर्याद मागे घेण्यासाठी हॉस्पिटल व्यवस्थापनाला 25 लाखांची खंडणीही मागितली. त्याविरुद्ध उषःकाल मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय कोगरेकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात पुराव्यानिशी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार भारतीय दंड संहिता 1860, कलम 385, कलम 500 व कलम 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उषःकाल हॉस्पिटलमध्ये श्रीमती शकुंतला शहा यांना त्यांचा नातू यश राहुल शहा यांनी दिनांक 16 मार्च 2024 रोजी डॉक्टर सतीश संकपाळ यांनी दिलेल्या संदर्भानुसार उपचारासाठी दाखल केल्या दाखल करते वेळी रुग्णालयाच्या सर्व शर्ती अटी मान्य करून आवश्यक त्या सर्व ठिकाणी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. सदर 77 वर्षाच्या रुग्णास अनेक व्याधी होत्या. त्यांच्यावर करण्यात येणारे उपचार, तपासण्या व अनुषंगिक सर्व माहिती व रुग्णाच्या नातेवाईकांना वेळा वेळोवेळी देण्यात येत होती. दिनांक 16 ते 19 मार्च दरम्यान सदर रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल होत्या. उपचारानंतर त्यांची प्रकृती बऱ्यापैकी सुधारली होती. तरीही त्यांना सक्तीने अतिदक्षता विभागातून बाहेर काढण्याचा हट्ट राहुल शहा यांनी धरला. त्यासाठी लेखी जोखीम पत्करून रुग्णास अन्य विभागात स्थलांतरित करण्यास भाग पाडले व रुग्णालयाचे थकीत बिल 29,346 बुडवून तेथून रुग्णासह आपल्या खाजगी वाहनामार्फत रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला व सुरक्षा यंत्रणेला दमदाटी करत पोबारा केला.


या घटनेनंतर लगेचच राहुल शहा यांनी रुग्णालयावर खोटेनाटे आरोप करीत, विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या आधारे पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडे 25 लाख रुपयांची खंडणी मागितली. परंतु हॉस्पिटल व्यवस्थापनाने अशी खंडणी देण्यास नकार दिला. त्यामुळे या पोलीस तक्रारीच्या आधारे एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या माध्यमातून स्वतःच निवेदन देणारा व्हिडिओ राहुल शहा यांनी तयार केला, तो विविध समाज माध्यमांच्या द्वारे प्रसारित केला व उषःकाल हॉस्पिटलची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. म्हणून या तिघांविरोध विश्रामबाग पोलीस ठाण्यात उषःकाल हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने रीतसर तक्रार दाखल केली आहे.

खंडणी मागितल्याचे, बदनामी केल्याचे व त्याचबरोबर रुग्णास जीवदान देणारे योग्य असे उपचार केले असल्याचे दाखले सादर करत, कायदेशीर कारवाई करण्यासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे. हा पुरावा ग्राह्य धरून, केलेल्या तक्रारीचे दखल घेत पोलिसांनी तिघाविरुद्ध भारतीय जनता दंड संहिता नुसार गुन्हा दाखल केला आहे.