सांगली समाचार - दि. १३|९२|२०२४
सांगली - येथे रविवार दि. १८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सांगली शाखा आणि आकार फाउंडेशन यांच्या वतीने सांगलीतील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ प्रशिक्षक डॉ.प्रदीप पाटील यांची 'चला अधिक रॅशनल होऊया ' ही एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे.
या कार्यशाळेबाबत सांगताना अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संजय निटवे म्हणाले की, समाजातील माणसांचे दुःख कमी करण्यासाठी मानववादी दृष्टीकोनातून समाज घडला पाहीजे. प्रत्येकाने आपल्यातील विवेक ( रॅशनॅलिटी) वापरून सत्याचा शोध घेतला तर विज्ञानाइतकीच मानवी मूल्ये महत्वाची ठरतात. समाज दैववादी करण्यापेक्षा मानववादी करण्यासाठी प्रत्येकाने अधिक रॅशनल झाले पाहीजे. या भूमिकेतून हा विषय ठेवला आहे.
रविवारी 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळात श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, विश्रामबाग, ही कार्यशाळा आहे. तसेच दिवसभर उपस्थित राहणाऱ्या अभ्यागतांसाठी दुपारी भोजनाची आणि चहाची निशुल्क व्यवस्था केलेली आहे.
कार्यशाळे बाबत अधिक माहिती सांगताना अंनिसचे कार्यकर्ते जगदीश काबरे, राहुल थोरात म्हणाले की, या कार्यशाळेत रॅशनॅलिटी म्हणजे नेमके काय ? आपले वागणे रॅशनल म्हणजेच विवेकी कसे बनवावे, रॅशनल वागण्याचे फायदे कोणते? जगताना रॅशनल उपाय, उपचार कसे करावेत? तसेच रॅशनल कौशल्ये कशी आत्मसात करून वापरावीत? अशा रॅशनॅलिटीच्या विविध अंगोपांगांवर मार्गदर्शन करतील सांगलीतील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ प्रशिक्षक डॉ. प्रदीप पाटील. ते अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनचे क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट सह सदस्य आहेत.
ही कार्यशाळा सांगली येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ. संजय निटवे यांच्या मातोश्री श्रीमती शामाबाई बाबुराव निटवे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ निटवे परिवाराकडून प्रायोजित केली आहे. या कार्यशाळेसाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक आहे. नोंदणीची अखेरची तारीख 15 फेब्रुवारी आहे. नोंदणी करण्यासाठी इच्छुकांनी कृपया आशा धनाले 9860453599, डॉ. सविता अक्कोळे 9371401312 यांना या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करावी असे आवाहन अंनिसचे कार्यकर्ते फारुख गवंडी, गीता ठाकर, प्रा. एस. के. माने, अमर खोत, सुनील भिंगे, वाघेश साळुंखे, मारुती शिरतोडे, इब्राहिम नदाफ यांनी केले आहे.