सांगली समाचार - दि. १३|०२|२०२४
मुंबई - अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वपदाचा राजीनामा दिला असून, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. भाजपाचे केंद्रीय नेते, गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा भाजपा प्रवेश निश्चित मानला जात आहे.
जशी भाजपाला अशोक चव्हाण यांची गरज आहे, तशीच अशोक चव्हाण यांनाही भाजपा आवश्यक आहे. आता एकमेकांची गरज का ? याबाबत जाणून घेऊयात...
* अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली तर काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणात फोडली जाऊ शकतात. ही मते फोडल्यामुळे राज्यसभेला भाजपच्या अतिरिक्त उमेदवाराचा विजय होईल. तसेच यामुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होईल.
* याआधी भाजपने हा प्रयोग विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत करून पाहिला आहे. प्रसाद लाड विधानपरिषद उमेदवार आणि धनंजय महाडिक राज्यसभा उमेदवार यांना उभं करून भाजपा महाविकास आघाडीची मते फोडण्यात यशस्वी झाली होती. आता देखील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी मतं फुटली तर महाविकास आघाडीमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होईल.
* अशोक चव्हाण यांच्या रूपात एक ज्येष्ठ आणि अनुभवी नेता मराठवाड्याला मिळाल्यामुळे भाजपाची मराठवाड्यातील ताकद वाढेल.
* लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांचा सारखा दिग्गज नेता गळाला लागला, तर काँग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करून आणखी आमदार काँग्रेसचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडले जाऊ शकतात.
अशोक चव्हाण यांच्यासाठी भाजप का महत्त्वाची ?
* नांदेडमध्ये चार साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाप्रकरणी आयकर विभागाची चौकशी सुरू होती, यामध्ये अशोक चव्हाण यांच्या निकटवर्तीयांची देखील चौकशी सुरू होती. भाजप प्रवेशामुळे कदाचित ही चौकशी थांबू शकते.
भाजपा प्रवेशामुळे अशोक चव्हाण यांना एक ज्येष्ठ नेते म्हणून मराठवाड्यामध्ये एक वेगळी स्पेस मिळू शकते.
* चव्हाण यांना मुख्यमंत्री आणि विविध खात्यांचे मंत्री म्हणून अनुभव असल्या कारणामुळे भाजपच्या मंत्रिमंडळात चांगली जबाबदारी मिळू शकते.
* भाजपमुळे अशोक चव्हाण यांना नांदेडचा बालेकिल्ला अबाधित राखता येईल.
* त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला, त्या अर्थी येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीतून राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे.