Sangli Samachar

The Janshakti News

तासगाव-कवठे महांकाळमध्ये घड्याळ कोणाच्या हातात ?


सांगली समाचार  - दि. १८|०२|२०२४

तासगाव -राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळाल्यानंतर तासगाव- कवठेमहांकाळ मतदारसंघातील घड्याळ चिन्ह सद्यस्थितीत तरी पोरके आहे. हे घड्याळ हातात बांधून विधानसभेच्या आखाड्यात उतरण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. जिल्हा बँकेचे माजी संचालक डॉ. प्रताप पाटील यांचे नाव सध्या चर्चेत आहे. 'नरो वा कुंजरोवा भूमिकेत असलेले माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या भूमिकेकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघावर घड्याळाचा गजर होत राहिला आहे. मात्र आता पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडे गेले आहे. सद्यस्थितीत या मतदारसंघात मोजकेच कार्यकर्ते  गटाकडे आहेत. मात्र, महायुतीच्या फॉर्म्युल्यात ही जागा राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याच्या चर्चा आहे. अशा परिस्थितीत मतदारसंघात पोरके झालेले घड्याळ हातात बांधण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे.

रोहित पाटील आणि प्रभाकर पाटील या दोन युवा नेत्यांचीच फॉर्म्युल्यात ही जागा राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याच्या चर्चा आहे. बदलत्या राजकीय समीकरणांनी राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्याशी जवळीकतेचे संबंध असलेले डॉ. प्रताप पाटील यांनीही येथील आखाड्यात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. येणाऱ्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून तासगाव- कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीमध्ये आणखी काही नेत्यांना प्रवेश देण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

गतवेळी महायुतीतून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे गेल्या पाच वर्षांत कोणत्याच पक्षाच्या व्यासपीठावर सक्रिय असल्याचे दिसून आले नाही. मात्र मागील दोन निवडणुकांचा अनुभव पाहता ऐनवेळी त्यांच्याकडून देखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर घोरपडे कोणती भूमिका घेणार याचीही मतदारसंघात कुतूहलता निर्माण झाली आहे.