Sangli Samachar

The Janshakti News

जेव्हा पोलीसच अंधश्रध्दा समोर झुकतात !...
सांगली समाचार दि. ०८ | ०२ | २०२४

उदगीर - एका बाजूला समाजातील अंधश्रद्धा कमी व्हावी म्हणून, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र शासन आणि पोलीस प्रयत्न करीत असतानाच, दुसऱ्या बाजूला पोलीस ठाण्याच्या गेटवरच आपल्या हद्दीतील गुन्हे कमी व्हावेत म्हणून, त्यावर मात्रा शोधत पोलीस ठाण्याच्या गेटवर पोलिसांनी स्वतःच बोकड कापून शांती केली. अंधश्रद्धेचा हा धक्कादायक प्रकार लातूर जिल्ह्यातील उदगीर पोलीस ठाण्यामध्ये घडला आहे.

वर्षभरापूर्वी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या पोलिस ठाण्याचा पदभार घेतल्यानंतर, ठाण्याच्या हद्दीत अपघात व गंभीर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले. यावर उपाय शोधण्यासाठी बोकडाचा बळी देण्याची भन्नाट कल्पना एका अधिकाऱ्याच्या सुपीक डोक्यातून बाहेर आली आणि त्याने आपल्या हाताखालील अधिकाऱ्यावर बोकड आणण्याची आणि पुढील विधी पार पडण्याची जबाबदारी सोपवली. तेव्हा त्याने एक बोकड आणि त्याला कापणारा कसाई आणून पोलीस ठाण्याच्या गेटवरच बोकड कापला व पुढील विधी पार पाडले.

या पुढील गंभीर भाग म्हणजे, सकाळी साडेनऊ ते दहा च्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या मुख्य गेटवर बोकडाचा बळी देण्यात आला. त्यानंतर त्याचे फोटो सेशन झाले आणि हा बोकड मलकापूर शिवारातील एका राजकीय पुढाऱ्याच्या फार्म हाऊस वर नेण्यात आला. तेथे बनवण्यात आलेल्या बिर्याणीवर सायंकाळी वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह, तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी यथेच्छ ताव मारला. या घटनेनंतर लातूर जिल्ह्यात हा चर्चेचा विषय बनला आहे.

याबाबत पत्रकारांनी उदगीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता, "आमच्या ठाण्यात जातीयवाद आणि गटबाजी आहे. तीन चार लॉबी या पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहेत. वर्षभर मी कोणालाही बेकायदेशीर काम करू दिले नाही. त्या रागातून किंवा गटबाजीतून हा फोटो व्हायरल केला असावा. मात्र हा प्रकार घडला तेव्हा मी पोलीस ठाण्यात नव्हतो, असे काही घडले असेल तर मी माहिती घेऊन, संबंधितांवर निश्चित कारवाई करेन" असे सांगितले आहे.