Sangli Samachar

The Janshakti News

हा सरकारी ट्रप; आंदोलन संपवण्याचा डाव, मनोज जरांगेंचा पलटवार

 


सांगली समाचार  - दि. २२|०२|२०२४

जालना - माझ्यावर आरोप करणारा हा कसला महाराज? बांधावरून उठला आणि महाराज झाला. अशा लोकांना मी मानत नाही. यापुढे मी त्यांना उत्तर देणार नाही, असा पलटवार मनोज जरांगे यांनी केला. बारस्कर हा सरकारी ट्रप असून हा आंदोलन संपविण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोपही जरांगे यांनी केला. मराठा आंदोलनातून मला बाजूला करण्यासाठी हरतऱहेचे प्रयत्न होत आहेत. 10 टक्क्यांच्या सापळ्यात मराठय़ांना अडकवण्याचे सरकारचे षड्यंत्र आहे. म्हणूनच माझ्यावर आज बेछूट आरोप करण्यात आले. अजय बारस्कर कुठल्या नेत्याबरोबर फिरत होता, कोणत्या नेत्याच्या मागे मागे पळत होता, याचे सगळे रेकॉर्डिंग्स आमच्याकडे आहेत. आता मराठय़ांना आरक्षण मिळत आहे, तर ही गोष्ट काही लोकांच्या डोळ्यात खुपतेय. जगद्गुरू तुकाराम महाराजांबद्दल तोंडून जे शब्द निघाले त्याबद्दल मला अत्यंत वाईट वाटते. मी त्यानंतर आत्मक्लेश केला. माफी मागितली, मी त्याबद्दल आताही तोंडात मारून घेतो. चुकून काहीतरी निघून गेलं असेल. परंतु, त्यानंतरही बारसकर हे सगळं बोलणारच आहे. त्याला तेच काम देण्यात आलं आहे. त्याला आपल्यावर टीका करण्याचा ठेका दिला आहे, असा आरोप जरांगे यांनी केला.

सरकारचा मोठा ट्रप आहे, असे जरांगे म्हणाले. सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. पण निवडणूक आयोगाने मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक घेऊ नये, असे मनोज जरांगे म्हणाले. सरकारने वेगळय़ा प्रवर्गातून देऊ केलेले 10 टक्के आरक्षण झिडकारून मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश नव्याने काढण्यात यावा, सग्यासोयऱयांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, या मागण्यांसाठी शनिवार 24 फेब्रुवारीपासून गावागावात रास्ता रोको करण्याची घोषणा केली. मराठा आरक्षणासाठी आता समाजातील वयोवृद्धही उपोषणाला बसतील, असेही ते म्हणाले.