Sangli Samachar

The Janshakti News

सौ. विजया पृथ्वीराज पाटील यांच्याकडून आस्था बिगर महिला निवारा केंद्रात नवविवाहितांचे पहिले माहेरपण

सांगली समाचार - दि. ११|०२|२०२४

मिरज - मिरजेतील आस्था बेघर महिला निवारा केंद्रात, आज पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. विजया पृथ्वीराज पाटील यांनी येथील नवविवाहितांची ओटी भरून, साडी चोरीचे वाण देत, वंचित बेघर महिलांचे लग्नानंतरचे पहिले माहेरपण केले. यावेळी शाहीन व सुरेखा शेख या अवलिया दांपत्याने दिव्यांग, मनोरुण, अत्याचारित व वंचित महिलांचे आई-वडील बनून महापालिकेच्या या निवारा केंद्रात निराधार बेघर महिलांना सन्मानाचे घर उपलब्ध करून दिले आहे. अशा महिलांच्या लग्नानंतरचे पहिले माहेरपण करताना, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता, असे उद्गार विजया पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना काढले.

यावेळी बोलताना शाहीन शेख म्हणाले की, गेल्या 24 वर्षातील हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पारखे झालेल्या, बेघर महिलांच्या माहेरपणाचा कार्यक्रम पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. विजया पाटील यांनी केला. हा उपक्रम म्हणजे त्यांनी केलेली दुःखमुक्तीची लढाई आहे. पृथ्वीराज पाटील हे कायमच गोरगरीब व वंचितांना मदत करणारे संवेदनशील व दयाळू लोकप्रतिनिधी आहेत. एक आगळावेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असा हा उपक्रम बेघर महिलांच्या जीवनात मातेच्या वात्सल्याची अनुभूती देणारा आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना सुरेखा शेख म्हणाल्या की, या निवारा केंद्रातील बेघर महिलांची लग्न आम्ही केले आणि पृथ्वीराज व सौ. विजया पाटील यांनी त्यांना संक्रातीचे वाण देऊन, त्यांचे माहेर पण केले. बेघर महिलांना विजया पाटील म्हणजे वासल्यसिंधू आईच आहेत असे वाटते.

यावेळी सौ. विजया पाटील यांनी शाहीन व सुरेखा शेख यांचा सत्कार करून, अशा बेघर महिला निवारा केंद्रासाठी, शासनाने मदत उपलब्ध करून देण्यासाठी हात आखडता घेऊ नये, तसेच समाजातील दान देण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी या बेघर निवारा केंद्राला सढळ हाताने दान देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी शरद ठोकळे, सविता राजेश चौधरी, कसबे डिग्रज येथील सहजीवन संस्थेचे अध्यक्ष महंमद खाटीक, सचिव स्नेहा सुतार, प्रा. एन. डी. बिरनाळे, दिलीप पवार आदी मान्यवर उपस्थित होते.