Sangli Samachar

The Janshakti News

स्टेट बँकेला दोन कोटींचा दंड; कॅनरा, सिटी युनियन बँकेवरही कारवाई

 


सांगली समाचार  - दि. २८|०२|२०२४

मुंबई - रिझर्व्ह बँकेने सोमवारी देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेला सुमारे दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. बरोबरीने कॅनरा बँक आणि सिटी युनियन बँकेवर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नियामकांनी दंडात्मक कारवाई केली. स्टेट बँकेवर ठेवीदार शिक्षण जागरूकता निधी योजना, २०१४ शी संबंधित काही नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल २ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सिटी युनियन बँकेला कर्ज खात्यांसंबंधी उत्पन्न निश्चिती, मालमत्ता वर्गीकरणविषयक नियमांचे उल्लंघन आणि बुडीत कर्ज खात्यांमधील विसंगती आढळल्याबद्दल ६६ लाख रुपयांचा दंड, तर काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने कॅनरा बँकेवर ३२.३० लाख रुपयांचा दंड ठोठावणारे स्वतंत्र आदेश सोमवारी काढले.

बँकेतर वित्तीय कंपनी ओशियन कॅपिटल मार्केट लिमिटेड, रूरकेला, ओडिशावर नियम उल्लंघनाबद्दल १६ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.दंडात्मक कारवाई झालेल्या प्रत्येक बँकेबाबतीत, रिझर्व्ह बँकेने हेही स्पष्ट केले आहे की, नियामक अनुपालनातील कमतरतेवर आधारित दंड ठोठावण्यात आला आहे आणि संबंधित बँकांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर यातून कोणतीही साशंकता व्यक्त करण्याचा या कारवाईमागे हेतू नाही.