सांगली समाचार - दि. २८|०२|२०२४
मुंबई - मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या मागे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राजेश टोपे असल्याचा आरोप भाजपने केला होता. या आरोपांवर आता उद्धव ठाकरेंनी महायुतीला जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. परंतु उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात जरांगे पाटील यांची बाजू घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. जरांगे पाटील यांना पाठबळ देण्यात कुठेतरी उद्धव ठाकरे यांचाही हात आहे का ? असा सवाल विचारला जात आहे.
उत्तरेतील शेतकरी एक-दीड वर्षापूर्वी आंदोलनाला उतरले होते. त्यांना अतिरेकी ठरवण्यापर्यंत मजल गेली होती. आता जरांगे पाटलांना तुम्ही अतिरेकी ठरवणार आहात का? असा सवाल ठाकरेंनी करत आंदोलनकर्त्यांला विश्वासात घेणं हे राज्यकर्त्यांचं काम असतं. त्याला गुन्हेगार ठरवणं हे राज्यकर्त्यांचं काम नसतं. असा राज्यकर्ता बिनकामाचा असतो,अशी टीका ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली आहे.
उद्धव ठाकरे प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. यावेळी जरांगेंच्या एसआयटी चौकशीच्या प्रकरणावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. "बघा, मला असं वाटतं की हे अत्यंत निर्घृण प्रकार आहे. ज्यावेळी जरांगे पाटील हे आंदोलनाला बसले होते. त्या काळात म्हणजे 1 ऑगस्ट... इंडियाची बैठक झालेली. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्यावर निर्घृण लाठीहल्ला झाला. अश्रुधुर सोडले. छर्ऱ्याच्या गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. महिलांची डोकी फोडली होती.' शरद पवार गेले होते. मी सुद्धा गेलो होतो. जणू काही हे अतिरेकी घुसले असं त्यांना वागवलं गेलं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आता आमच्याकडून (विरोधक) त्यांना फोन केले असतील तर आताच्या ज्या महासंचालक आहेत, त्या यातल्या एक्स्पर्ट आहेत. त्यांच्याकडे जरांगे पाटलांच्या फोनचा रेकॉर्ड असेल, आमच्याही फोनचा रेकॉर्ड असेल, देवेंद्र फडणवीसांनी तो घ्यावा, असा टोला ठाकरेंनी लगावला.
तसेच ''कुणी आंदोलनाला उभं राहिलं तर त्याच्यावर तुम्ही त्याला गुन्हेगार ठरवायचं. ज्या पद्धतीने उत्तरेतील शेतकरी एक-दीड वर्षापूर्वी आंदोलनाला उतरले होते. त्यांना अतिरेकी ठरवण्यापर्यंत मजल गेली होती. आता जरांगे पाटलांना तुम्ही अतिरेकी ठरवणार आहात का? हा एवढाच भाग राहिला आहे. म्हणजे कुणी न्याय हक्कासाठी उतरायचंच नाही का? एखाद्याची मागणी कदाचित चुकीची असेल किंवा पूर्ण करता येत नसेल, तर त्याला विश्वासात घेणं हे राज्यकर्त्यांचं काम असतं. त्याला गुन्हेगार ठरवणं हे राज्यकर्त्यांचं काम नसतं. असा राज्यकर्ता बिनकामाचा असतो'', अशी टीका देखील ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली.
अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?
"जयंतरावांनी जे म्हटलं ते बरोबर आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडलेला आहे. काल-परवा राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळीचा फटका जसा बसला, तसा महाराष्ट्रातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्राला या घोषणांच्या पावसाचा फटका बसेल की, काय अशी शक्यता आहे. याचं कारण असं विकास योजनांच्या नावाखाली लाखो करोडो रुपयांच्या योजनांची घोषणा झालेली आहे'', अशी टीका ठाकरेंनी महायुती सरकारवर केली.
"शेतकरी आक्रोश करतोय, त्याच्या पदरात काहीच पडलेलं नाही. या सरकारचा दीड-दोन वर्षातील कारभार पाहिलात... विशेषतः मी मुंबई पुरतं जरी बोललो तर मुंबईमध्ये रस्ते घोटाळा आहे. आणखी काही घोटाळा आहे. टेंडरवर टेंडर हे लोक काढताहेत. टेंडर काढल्यावर आम्ही त्यातला घोटाळा बाहेर काढतो. मग, ते पुन्हा टेंडर काढतात.प्रत्यक्षात काम काहीच होत नाही, अशी टीका देखील ठाकरेंनी सरकारवर केली.
"महायुती सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे यांचे कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात आणि शेतकरी कोमात असा हा अर्थसंकल्प आहे', अशी टीका ठाकरेंनी अर्थसंकल्पावर केली. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स संपावर आहेत. त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं जात नाही. शासकीय रुग्णालयात डॉक्टर आणि औषधाविना मृत्यू झालेले आपण बघितले. तिकडे लक्ष दिले गेले नाही. नवीन रुग्णालय, बेड वाढवणार अशा काही घोषणा आहेत, असे विधान करून ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला.