Sangli Samachar

The Janshakti News

हास्यस्फोट घडविणारे मजेदार मथळे !




सांगली समाचार | दि. ०५ |०२|२०२४


वृत्तपत्रातील असो, सोशल मीडियावरील असो वा वॉट्सॲपवरील... बातमी किंवा माहितीचा मथळा अर्थात हेडिंग वाचकांना आकर्षित करीत असतात. म्हणूनच बातमीचं अथवा माहितीचं हेडिंग अधिकाधिक आकर्षक करण्याकडे बहुतेकांचा कल असतो.

काही बातम्यांचे मथळेच लक्ष खेचक असतात...*

उदाहरणार्थ.....😊

खूप वर्षांपूर्वी, एक महिला विमानप्रवासात प्रसूत झाली. त्या बातमीचे हेडिंग होते..._

*'तिच्या भाळी , जन्म आभाळी.'*

***

_वजनात मारणे हा रद्दीवाल्यांचा आणि भाजीवाल्यांचा जणू हक्कच असतो. त्यावर वैधमापन विभागाने कारवाई सुरू केली. त्या बातमीचं हेडिंग होतं..._

*'मापात पाप' करणार्‍यांना चाप!*

***

_एके वर्षी मुंबई पावसात तुंबली._

_बातमीचं हेडिंग होतं..._

*'तुंबई'!*

***

_एका बातमीचं हेडिंग भारी वास्तव वाटलं..._

*"अटक न करण्यासाठी लाच घेताना अटक!"*

***

_आता त्याला बरीच वर्षें झाली. छगन भुजबळ तेव्हा मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेने महापौर असताना त्यांना सनसनाटी गोष्टी करायला फार आवडत असे. गणपती विसर्जनाच्या दिवशी त्यांनी हेलिकाॅप्टरमधून मिरवणूकीतून वाजतगाजत जाणाऱ्या गणपतीच्या मूर्तींवर पुष्पवृष्टी केली. दुसऱ्या दिवशी लोकसत्ताचे हेडिंग होते:

*मानवाची आकाशातून देवांवर पुष्पवृष्टी*

***

_बाय द वे, एक आठवणीतलं हेडिंग आठवलं..._

*'जीव वाचवण्यासाठी पळताना*

*खड्ड्यात पडून मृत्यू!'*

***

_सौरभ गांगुली (डावखुरा) आणि युवराज सिंग यांनी पाकिस्तानविरुद्ध त्रिशतकी भागीदारी केली आणि त्याच दिवशी कम्युनिस्टांनी मनमोहनसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी दिली..._

_लोकसत्ता फ्रंट पेज हेडिंग..._

*'डाव्यांचा तडाखा!'*

***

_मागे कोल्हापुरात एक खून खटला गाजला होता. त्याच्या बातम्या खूप वाचल्या जायच्या. सहाजिकच, साक्षी, पुरावे, उलट तपासणी यांत हेडिंगचा मसाला मिळायचा. त्याच काळात, एका स्थानिक पेपरची हेडलाईन होती..._

*'नाम्या, बगतूस काय? घाल गोळी!'*

***

_राहुल द्रविड च्या निवृत्ती वेळी_

_एका इंग्रजी पेपरचा अप्रतिम मथळा होता..._

*'Indian team is now bread n butter*

*but without Jammy'*

***

_भारताने वानखेडेत होणाऱ्या विश्वचषक अंतिम फेरी धडक मारली, तेव्हाचा एक अप्रतिम मथळा..._

*'चारले खडे, आता वानखेडे'*

***

_मटा ऑनलाइन मथळा..._

*'पतंजली कोलगेटचे दात पाडणार!'*

***

_हे थोडं आक्षेपार्ह आणि तितकंच गमतीदार हेडिंग…_

_गोव्यात 'पाळी' नावाचं गाव आहे. विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेपूर्वी पाळी हा एक मतदारसंघ होता. निवडणुकीस एक नामांकित डॉक्टर उभे राहिले. मोठा मेळावा घेतला. धडाकेबाज भाषणे झाली. गोव्यातल्या एका नामांकित मराठी दैनिकाने दुसऱ्या दिवशी हेडिंग दिले..._

*"डॉ. ××××× पाळीच्या समस्या सोडविणार!"*

_(बोंबला!)_

***

_वादग्रस्ततेमुळे खैरनार यांची देवनार कत्तलखान्यात बदली झाली आणि त्यांनी तिथला कत्तलखानाच बंद करण्याच्या हालचाली आरंभल्या होत्या. त्याचे माझा मित्र पंढरीनाथ सावंत याने दिलेले हेडींग अजून लक्षात राहिले आहे..._

*'खैरनार देवनारचे पवनार करणार!'*

***

_या सर्वावर कडी करणारी हेडलाईन लोकसत्ताच्या अशोक पडबिद्री यांनी बर्‍याच वर्षांपूर्वी दिली होती. मुंबईत एका वर्षी प्रचंड म्हणजे प्रचंडच पाऊस झाला. अलीकडच्या 26 जुलैसारखाच. सारी मुंबई ठप्प झाली. लोकसत्ताची हेडलाईन होती..._

*'मुंबापुरीवर जलात्कार!!!'*

***

_२००४ साली अटल सरकारचा पराभव करुन काँग्रेस बहुमताने जिंकली. त्यावेळचं टाईम्स ऑफ इंडियाचं हेडींग होतं..._

*'King Cong... Queen Sonia' !*

_(अर्थात परदेशी जन्माच्या प्रश्नावरुन सोनिया गांधींनी नंतर पंतप्रधानपद नाकारलं हा भाग वेगळा.)_

***

_बुटासिंग २००५ मध्ये बिहारचे राज्यपाल असताना तेथील त्रिशंकू विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस त्यांनी केली होती. त्यामुळे तत्कालीन केंद्र सरकारने तशी शिफारस राष्ट्रपतींकडे करून तेव्हा जदयू-भाजपच्या संभाव्य युतीला सरकार बनविण्यापासून रोखले होते._

_सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द ठरवीत केंद्र सरकारवर कठोर प्रहार केले होते. तेव्हा एक शीर्षक होते (बहुधा "सामना"चे)..._ -

*सर्वोच्च न्यायालयाने*

*केंद्र सरकारला*

*'बुटा' ने हाणले!'*

***

_मध्यंतरी बालाजी तांबे यांना त्यांच्या गर्भसंस्कार या पुस्तकातील आक्षेपार्ह गोष्टींबद्दल खुलासा करण्याचे आदेश दिले होते तेव्हा लोकमत की कुठल्याशा वर्तमानपत्राने बातमी दिली होती; त्याचे हेडिंग होते..._

*'तांबेचं पितळ उघडं !'*

***

_मे, २०१४ मध्ये, निवडणूक निकालानंतर, लोकसत्ता च्या मुख्य बातमीचे हेडिंग होते..._

*'हाताची घडी, कमळावर बोट!'*

***

_नवाकाळचे एक हेडिंग..._

तेव्हा जयसूर्या जबरदस्त फाॕर्माॕत होता आणि आपण मॕच जिंकलो होतो.

*'श्रीकांतने जयसूर्याला गिळले.*

*भारताच्या क्रिकेटसंघाने साजरी केली ..*
*"श्रीलंकेत हनुमान जयंती!"*

********************************

_(सौजन्य : ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी)_.