Sangli Samachar

The Janshakti News

"काकां" गटावर चालणार नाही "दादागिरी"

सांगली समाचार  - दि. २०|०२|२०२४

नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिलेले 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार' हे नाव पुढील आदेशापर्यंत वापरण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (१९ फेब्रुवारी) दिली असून, २६ फेब्रुवारी रोजी सुरू होणाऱ्या नियमित अधिवेशनात शरद पवार गटाचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहणार आहे. तसेच २७ फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीतही शरद पवार समर्थक आमदार, खासदारांना अजितदादा गटाचा व्हीप लागू होणार नाही. थोडक्यात शरद पवार गटाला कोंडीत पकडण्याचा अजितदादांच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे.

७ फेब्रुवारीला निवडणूक आयोगाने अजित गटाला खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याची मान्यता दिली. घड्याळ चिन्हही दिले. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनीही आमदार अपात्रता प्रकरणात अजित पवार तसेच शरद पवार गटाचे सर्व आमदार पात्र ठरवले.

त्याविरुद्ध शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत, के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. शरद गटाने चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे ८ दिवसांत अर्ज करावा आणि आयोगाने त्यावर तत्काळ निर्णय घ्यावा, असेही कोर्टाने बजावले.