Sangli Samachar

The Janshakti News

बंगल्याच्या जागी झोपडी दाखवली, बागायती जमीन कोरडवाहू - प्रकाश शेंडगे

 


सांगली समाचार  - दि. १६|०२|२०२४

मुंबई  - मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाने केलेले सर्वेक्षण हे अयोग्य पद्धतीने आणि खोटी माहिती नोंदवून करण्यात आल्याचा गंभीर आरोप ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) पुन्हा एकदा समाजाची फसवणूक केली जात आहे. राज्य मागासवर्ग आयोग हा मराठा आयोग झाला होता. त्यांच्याकडून मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण करण्यात आले. अवघ्या ८ ते १० दिवसांमध्ये १ कोटी ५८ लाख कुटुंबांचे घिसडघाईने सर्वेक्षण करण्यात आल्याची टीका प्रकाश शेंडगे यांनी केली.

प्रकाश शेंडगे यांनी मराठा सर्वेक्षणादरम्यान खोटी माहिती नोंदवून घेतल्याचे म्हटले. जिथे मराठा कुटुंबाचा बंगला असेल किंवा पक्कं घर असेल तिथे झोपडी दाखवण्यात आली आहे. तर बागायती जमीन असलेल्या कुटुंबांच्या नोंदीमध्ये कोरडवाहू जमीन दाखवण्यात आली आहे. नोकरी करत असलेले लोक रोजंदारीवर कामाला जातात, असे दाखवण्यात आले आहे. सर्वेक्षण करणाऱ्यांना तशा सूचना देण्यात आल्या होत्या. या सगळ्या गोष्टी करुन या सर्वेक्षणात चुकीची माहिती नोंदवून घेण्यात आल्याचा आरोपही प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.