Sangli Samachar

The Janshakti News

काँग्रेसला निवडणुकीच्या तोंडावर मोठा झटका, आयकर विभागाकडून पक्षाची बँक खाती गोठवली

 


सांगली समाचार - दि. १६!०२!२०२४

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेस आणि युवा काँग्रेसचे बँक अकाऊंट फ्रीज केल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. काँग्रेस नेते अजय माकन यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. पक्षाचे बँक अकाऊंट फ्रीज केल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले अजय माकन ?

देशातील प्रमुख विरोधी पक्षाची सर्व बँक खाती गोठवण्यात आली आल्याचं आम्हाला सांगितल आहे. काँग्रेस पक्षाची देखील खाती गोठवण्यात आली आहेत. आम्हाला समजलं की युवक काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. आयकराने युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून 210 कोटी रुपयांची वसुली मागितली आहे. आमच्या खात्यांमध्ये क्राउडफंडिंगचे पैसे गोठवण्यात आले आहेत. निवडणुकीच्या दोन आठवडे आधी जेव्हा विरोधी पक्षांची खाती गोठवली जातात तेव्हा हे लोकशाही गोठवण्यासारखेच आहे, असा दावा अजय माकन यांनी केला आहे.


निवडणुकीत असंवैधानिक निधीचा गैरवापर होण्याचा खर्गेंकडून आरोप 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. सत्तेची नशा, मोदी सरकारने लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वात जुन्या, सर्वात मोठ्या विरोधी पक्ष काँग्रेसची खाती गोठवली आहेत. हा लोकशाही मोठा आघात आहे. भाजपने जे असंवैधानिक धन जमा केलं आहे, त्याचा वापर ते निवडणुकीत करतील, असं खरगेंनी म्हटलं आहे.

भविष्यात कोणत्याही निवडणुका होणार नाहीत

आम्ही क्राउफंडिंगद्वारे जो पैसा जमा केला आहे तो फ्रीज करण्यात आलं आहे. त्यामुळे आम्ही म्हणतोय भविष्यात कोणत्याही निवडणुका होणार नाहीत. आमचं न्यायव्यवस्थेला आवाहन आहे की देशातील बहुपक्षीय प्रणाली सुरक्षित ठेवा आणि लोकशाही सुरक्षित ठेवा. आम्ही या हुकूमशाहीविरोधात लढा देऊ, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.