Sangli Samachar

The Janshakti News

अजितदादांची शरद पवार गटाला साद...





सांगली समाचार दि. ०८|०२|२०२४

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा आणि चिन्ह अजितदादा गटाकडे दिल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. आमदार आणि खासदारांचे संख्याबळ तसेच बहुमताच्या जोरावर हा निर्णय अजितदादा गटाच्या बाजूने लागला. राष्ट्रवादीचे पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील नेते पदाधिकारी यांना आवाहन करण्यात आलं आहे. "आमच्याकडे येणाऱ्यांचं खुल्या मनाने आम्ही स्वागत करू" असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार गटातील पदाधिकारी आणि नेत्यांना साद घातली आहे.

अजित पवार यांनी म्हटलं की, ज्यांना घड्याळ एनसीपी चिन्ह  मान्य असेल ते पक्षाचा झेंडा, पक्षाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आमच्या सोबत येऊ शकतात. आमच्याकडे येणाऱ्याचं खुल्या मनाने आम्ही स्वागत करू. कोणताही मनात राग न बाळगता सर्वांचं खुल्या मनाने स्वागत केलं जाईल यासोबतच योग्य सन्मान देखील केला जाईल.

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवार यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की,"आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत." दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी निकाल धक्कादायक असल्याचं म्हणत निकालाचा सविस्तर अभ्यास करून त्यावर भाष्य करू असं म्हटलं. निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी
सर्वोच्च न्यायालयात  याचिका दाखल करण्यासाठी खलबतं सुरू झाली. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी आदिती नलावडे आणि वकील दाखल झाले आहेत. सुप्रीम कोर्टात शरद पवार यांच्यावतीने निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या नावाबद्दल पत्र देण्यात येणार आहे.