Sangli Samachar

The Janshakti News

अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर !



सांगली समाचार  दि. १०|०२|२०२४

मुंबई  - शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पूत्र आणि ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची दहीसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगर येथील गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण शांत होत नाही तोवर राज्यात आणखी एक हत्याकांड घडलं आहे. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या मॉरिस नोरोन्हा यानेदेखील आत्महत्या केली आहे.

मॉरिस नोरोन्हा हा दहिसर- बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत होता. स्थानिक राजकीय वर्तृळात मॉरिस हा एक स्वयंघोषित नेता म्हणून ओळखला जात होता. अभिषेक घोसाळकर यांनी गुरुवारी (८ फेब्रुवारी) संध्याकाळी मॉरिसबरोबर फेसबूक लाइव्ह केलं होतं. या फेसबूक लाईव्हदरम्यान, मॉरिसने अभिषेक घोसाळकरांवर पाच गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. अभिषेक घोसाळकर फेसबूक लाइव्हद्वारे लोकांशी बोलत होते. ते म्हणत होते, 'ही तर फक्त सुरुवात आहे. आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे.' हा संवाद संपल्यावर अभिषेक घोसाळकर उठून उभे राहिले. त्याचवेळी मॉरिसने त्यांच्यावर सलग पाच गोळ्या झाडल्या.

राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये गोळीबार आणि हत्येच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून विरोधक राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शस्त्र परवानाधारक त्यांच्याकडील शस्त्रांचा दुरुपयोग करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे पोलीस शस्त्र परवानाधारकांना बोलावून त्यांची चौकशी करणार आहेत. त्याचबरोबर मॉरिस नोरोन्हा याने अभिषेक घोसाळकर यांच्याहर हल्ला करण्यासाठी वापरलेलं पिस्तुल अवैधरित्या खरेदी केलं होतं, अशी माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी मॉरिसला कोणताही शस्त्र परवाना दिला नव्हता, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

घोसाळकर हत्याप्रकरणानंतर विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करू लागले आहेत. ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी घोसाळकर यांच्यावर गोळीबार करणारा मॉरिस नोरोन्हा याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे फोटो एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर करत थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केले आहेत. या आरोपांना उत्तर देण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सामंत यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालत आहेत. राज्यात ज्यांच्याकडे शस्त्रं आहेत त्यांची आता चौकशी होणार आहे. ही शस्त्रं परवान्यासह बाळगली आहेत की, परवान्याशिवाय, याचा तपास केला जाईल, चौकशी होईल. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले आहेत.

दरम्यान, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी या घटनेबाबतची माहिती देताना सांगितलं, गोळीबारासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचे स्त्रोत आणि त्याच्या कायदेशीर मान्यतेची खात्री करून घेत आहोत. गोळीबारानंतर घटनास्थळावरून दोन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं, उपचारांती दोघांचाही मृत्यू झाला आहे. आम्ही सध्या घटनास्थळावरून पुरावे संकलित करण्याचं काम करत आहोत. तसेच फेसबूक लाइव्ह आणि इतर काही पुरावे तपासात घेतले जातील.