सांगली समाचार दि. ०८|०२|२०२४
आष्टा - येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी इस्रोच्या सहकार्याने महाविद्यालयाचा लघु उपग्रह (नॅनो सॅटेलाईट) जून २०२६ पर्यंत अवकाशात प्रक्षेपित करणार असल्याची माहिती इस्त्रोचे उपसंचालक डॉ. वेंकटेश्वर शर्मा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब डांगे, कार्यकारी संचालक प्रा. आर.ए. कनाई व महाविद्यालयाचे संचालक डॉ. विक्रम पाटील उपस्थित होते.
यावेळी, डॉ. शर्मा म्हणाले की, डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करणे व त्यांच्यात संशोधन वृत्ती वृद्धिंगत करण्यासाठी इस्रोच्या सहकार्याने जून २०२४ पासून नॅनो उपग्रह तयार करण्यास सुरुवात केली जाईल. यामध्ये सर्व विभागातील विद्यार्थी व प्राध्यापक यांचा एक गट तयार केला जाईल व अखंडपणे जवळजवळ तीन वर्षे हे काम सुरु राहील. यासाठी आवश्यक ते सहकार्य इस्त्रो कडून दिले जाईल. असा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविणारे हे महाराष्ट्रातील पहिलेव खाजगी महाविद्यालय असेल.
हेही वाचा…सांगली: चोरट्याला अटक करुन १२ लाख ७३ हजाराचे दागिने हस्तगत
या उपग्रहाचा वापर देशातील व परदेशातील इतर संस्थाना त्यांचे संशोधन सुरु ठेवण्यासाठीही करता येईल, अशी माहिती डॉ. शर्मा यांनी दिली. इस्रोकडून डिसेंबर २०२४ पर्यंत यंत्रमानव अंतराळात पाठविण्यात येणार असून सध्या हे काम प्रायोगिक पातळीवर सुरू आहे. यानंतर भारतीय मानवाला अंतराळात पाठविण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे डॉ. शर्मा यांनी यावेळी सांगितले. या उपग्रहासाठी अंदाजे दीड ते दोन कोटी एवढा प्रचंड खर्च अपेक्षित आहे परंतु मुलांच्या कौशल्य विकासासाठी व त्यांच्या संशोधन वृतीस चालना देण्यासाठी संस्था सर्व प्रकारचे सहकार्य करेल असे कार्यकारी संचालक प्रा. कनाई यांनी यावेळी सांगितले.