Sangli Samachar

The Janshakti News

महाराष्ट्रातील आणखी एक दिग्गज नेता भाजपवासी



सांगली समाचार  - दि. २७|०२|२०२४
मुंबई - महाराष्ट्र काँग्रेसला लागलेलं ग्रहण काही कमी होताना दिसत नाही. महाराष्ट्र काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये पक्षाला रामराम ठोकला आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांचा समावेश आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश कोला आहे. मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. या दोन्ही नेत्यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली आहे. त्यांची राज्यसभेची खासदारकी जवळपास निश्चित आहे. तर दुसरीकडे बाबा सिद्दीकी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या तीन नेत्यांमुळे काँग्रेस पक्षाची वैयक्तिक पक्ष संघटनेबाबत मोठी हानी झालेली असताना आता काँग्रेसला पुन्हा मोठं खिंडार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसमधील आणखी एक दिग्गज नेता पक्षाला रामराम ठोकून भाजपात जाणार आहे.

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पुन्हा मोठा भूकंप येणार आहे. कारण काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री बसवराज पाटील हे भाजपात जाणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. बसवराज पाटील हे काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत. पण त्यांनी आता कार्यध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. ते उद्या सकाळी 11 वाजता भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानकुळे यांच्या उपस्थितीत बसवराज पाटील यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. बसवराज पाटील हे काँगेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आहेत. त्यांचं धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, लोहारा, तुळजापूर या भागात प्राबल्य आहे.

बसवराज पाटील यांचा राजकीय प्रवास

बसवराज पाटील धाराशिव जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील मुरुमचे आहेत. ते 1999 च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा निवडून आले होते. त्यांचं पक्षात त्यावेळी चांगलं स्थान होतं. त्यामुळे त्यांना त्यावेळी मंत्रिपदाची संधी मिळाली होती. बसवराज पाटील हे 1999 ते 2004 या काळात महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री होते. पण 2004 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. ते सर्वात आधी उमरगा विधानसभेतून जिंकून आले होते. पण पुढे हा मतदारसंघ आरक्षित झाला. त्यामुळे पक्षाने त्यांना 2009 च्या निवडणुकीत औसा मतदारसंघातून उमेदवारी दिली.

या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. तसेच त्याच्या पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीत म्हणजे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असताना त्यांचा विजय झाला होता. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. यानंतर पक्षाने त्यांना प्रदेश कार्याध्यक्षापदाची संधी दिली. प्रत्येक विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला बसवराज पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या बातम्या चर्चेत येत होत्या. पण यावेळी बसवराज खरंच भाजपात जाण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे धाराशिवमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडणार आहे.