Sangli Samachar

The Janshakti News

फडणवीसांना शिव्या, टोपेंना टाळ्या.. "त्या" फोटोवरून राजेश टोपे यांची गोची ! मात्र...


सांगली समाचार  - दि. २८|०२|२०२४

मुंबई  - मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन त्यांच्याच समर्थकांनी संशयाच्या फेऱ्यात आणल्यावर ते खवळले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आई माई काढत त्यांच्यावर बरसले आणि पूर्णपणे अडचणीत आले. मनोज जरांगे यांचे आंदोलन पूर्ण "एक्स्पोज" झाले. त्या आंदोलनामागे कोण मास्टरमाईंड आहे याचे खुलासे त्यांच्या आणि शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या समान नॅरेटिव्ह मधून समोर आले आणि जरांगेंच्या भडक्यात आणखी भर पडली. ते सतत वाहवत गेले आणि आता राज्य सरकारने नेमलेल्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमच्या स्कॅनर खाली आले.

या सगळ्या घटनाक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची सगळी पाळेमुळे खणून काढायचे ठरवल्याबरोबर माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे पुढे आले आणि आपला यात कणभर जरी दोष असेल तरी आपण राजकारणातून संन्यास घेऊ अशी घोषणा कर्ते झाले, पण दरम्यानच्या काळात "फडणवीसांना शिव्या आणि टोपेंना टाळ्या" हा मनोज जरांगे यांचा राजेश टोपे यांना टाळ्या देत असलेला फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनादरम्यान अंतर्वली सराटीत दगडफेक कोणी, कशी, केव्हा केली?? त्यासाठी कुठल्या कारखान्यातून सर्व प्रकारचे "इंधन" पुरवले गेले??, त्या कारखान्याची मालकी कोणाकडे आहे?? याच्या तपशीलवार चर्चा सोशल मीडियातून समोर आल्या. मनोज जरांगेंच्या बैठका कुठे आणि कुणी घेतल्या?? गुप्त बैठकांमधले संदेश एकमेकांना कसे पोहोचले??, याचे सगळे खुलासे बाहेर आले. त्यामुळे राजेश टोपे पुरते अडचणीत आले.

राजेश टोपेंच्या "हालचालींना" "ब्रेक"

राजेश टोपे यांनी दोनच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन आपल्याबरोबर 6 आमदार राष्ट्रवादीच्या गोटात आणण्याची तयारी दाखवली होती, पण त्याला अचानक "ब्रेक" लागला. याच टाइमिंग दरम्यान मनोज जरांगे देवेंद्र फडणवीसांवर "अचानक" भडकले आणि सगळ्याच प्रकरणाला एक "वेगळे" वळण लागले. याचा सहज थांगपत्ता कोणाला लागला नाही. पण राजेश टोपे यांनी अजित पवारांची भेट घेऊन 6 आमदार राष्ट्रवादीच्या गोटात आणण्याची तयारी दाखवणे, त्याच वेळी संजय राऊत यांनी एका दिवसात भाजप संपवू असे म्हणणे आणि तेच नॅरेटिव्ह पुढे नेत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना शिव्या देणे, हा घटनाक्रम एकापाठोपाठ घडला. त्यामुळे मराठा आंदोलन पूर्णपणे संशयाच्या गर्तेत अडकले हे "सहज" किंवा योगायोगाने घडलेले नाही. त्यातूनच फडणवीसांना शिवाय शिव्या आणि टोपेंना टाळ्या हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आणि मराठा आंदोलनातला मास्टरमाईंडचा एक घटक उघडा पडला!!

राजेश टोपेंकडून खुलासा, म्हणाले...

मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप करत, आमदार राजेश टोपे यांच्या कारखान्यावर आंदोलनाचे षडयंत्र रचले जात होते, असा गंभीर आरोप प्रविण दरेकर यांनी केला. या आरोपाबाबत राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधत सविस्तर खुलासा केला आहे.

"माझ्यावरील कोणत्याही आरोपात सत्यता नाही. राजेश टोपेला जे लोक ओळखतात, त्यांना माहीत आहे की मी दंगल घडवणारा माणूस नाही, दगडफेक करणारा माणूस नाही, दगडफेकीला प्रोत्साहन देणारा माणूस नाही. अशा प्रकरणात खरंच एसआयटी नेमायला हवी का? हा प्रश्न आहे. मात्र आता एसआयटीमधून सर्व चित्र स्पष्ट होईल. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आम्ही दोन-दोन वर्षे यापूर्वी सामोरे गेलो आहोत. त्यावेळी आम्ही पोलीस प्रशासनाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना संयमाने आणि सबुरीने हे आंदोलन हाताळण्याच्या सूचना देत होतो. ज्यावेळी लाठीचार्ज त्यावेळी मी तिथं जरूर गेलो. पण कशासाठी गेलो तर तिथं जे लोक जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेलो. तसंच काही रुग्णांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला न्यायचं होतं, यासाठी मी तिथं गेलो. काही लोकं तेव्हा भयभयीत होऊन उसात वगैरे गेले होते. त्यामुळे मी तिथं गेलो होतो. माझा दुसरा कोणताही उद्देश नव्हता," असं स्पष्टीकरण टोपे यांनी दिलं आहे.

एसआयटी गठित करण्याच्या सरकारच्या निर्णयाबद्दल बोलताना राजेश टोपे म्हणाले की, "चौकशीला बोलावलं तर मी नक्की जाईन. माझी काम करण्याची पद्धत जनतेला माहीत आहे. आम्ही कधी साधी मुंगीही मारली नाही. अशा पद्धतीचे आम्ही संवेदनशील लोक आहोत. आंदोलनस्थळापासून आमचा कारखाना पाच किलोमीटर अंतरावर आहे. एखाद्याची राहण्याची व्यवस्था नसेल तर आपण त्याला कारखान्यावर राहायला जागा उपलब्ध करून देतो. मीडियातील काही लोकंही गरेज असेल तेव्हा तिथे राहतात," असा दावा टोपे यांनी केला आहे.