Sangli Samachar

The Janshakti News

राष्ट्रवादी पक्ष अजितदादांचाच! काकांच्या हातातून घड्याळ निसटलं!




सांगली समाचार  | मंगळवार दि. ०६ |०२|२०२४

नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निकाल दिला आहे.

अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? यावर सुनावणी पार पडली होती. अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून सुनावणीवेळी जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणूक झाली नसल्याचा युक्तीवाद अजित पवार गटाकडून केला गेला होता.

निवडणूक आयोगाकडे दिलेल्या पत्रात, अजित पवारांनी सर्वाधिक आमदार, खासदार आणि पदाधिकारी आपल्याकडे असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच आहे, असा दावा केला होता. या आमदार-खासदारांचं प्रतिज्ञापत्रही अजित पवारांनी निवडणूक आयोगाला दिलं होतं. तसंच आता आपणच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याचंही आयोगाला कळवलं होतं, यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला त्यांची बाजू मांडण्याबाबतची नोटीस दिली होती. पण शरद पवार यांनी सादर केलेली कागदपत्र मागे पडली आहे.