Sangli Samachar

The Janshakti News

सांगली समाचार : सुरूवात एका आनंददायक प्रवासाची !




१९७५ ते १९९२ पर्यंतचा सांगली समाचार दैनिकाचा प्रवास अत्यंत खडतर नि आपल्या-परक्याची, योग्य-अयोग्यतेची ओळख करून देणारा, पण मनाला एक वेगळा आनंद देणारा ठरला... खरं तर या प्रवासाबद्दल खूप काही लिहिता-बोलता येण्यासारखं... पण आज इतकंच सांगेन, आजचा दिवस दोन दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे... पहिलं म्हणजे आज माझे पिताश्री नि सांगली समाचारचे संस्थापक-आद्य संपादक स्व. एन्. बी. सरडे यांचा ३५ वा स्मृतीदिन... आणि दुसरं म्हणजे आजपासून सांगली समाचारचा प्रवास सध्याच्या लोकप्रिय सोशल मीडियाशी जोडल्या गेलेल्या वेबपोर्टलच्या प्लॅटफॉर्मवरून नव्याने सुरू होतो आहे... स्व. एन्. बी. सरडे यांना यापेक्षा सर्वोत्तम आदरांजली अन्य कोणती असू शकते ?...

स्व. एन्. बी. सरडे यांनी सांगली समाचार दैनिक सुरू केले ते स्वतःवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी... पण नंतर त्यांनी शेवटपर्यंत एक पथ्य पाळले, आपल्या पेपरमध्ये स्वतःचं नाव कधीही छापलं नाही. स्वतःसाठी याचा वापर कधीही केला नाही याशिवाय इतरही अनेक नियम स्वतःसाठी ठरवलेले होते. आणि मला अभिमान आहे, सांगली समाचारचे सारथ्य माझ्याकडे आल्यानंतर, ती परंपरा मी पुढे कायम ठेवली. आता नव्याने सुरू होणाऱ्या प्रवासातही हीच परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार मी यानिमित्ताने व्यक्त करतो आहे...

खरं तर हा नवा प्रवास सुरू होण्याचे सारे श्रेय जाते ते, माझे बंधूतुल्य मित्र आणि ई-दैनिक सांगली समाचारच्या कार्यकारी संपादकपदाची जबाबदारी आनंदाने स्विकारलेल्या श्री. चंद्रकांत क्षीरसागर यांना. त्यांच्याच सातत्यपूर्ण आग्रहाने नि प्रयत्नाने मी हा निर्णय घेतला. याठिकाणी आणखी एक नाव घ्यावे लागेल, ते म्हणजे मराठी पत्रकार परिषदेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री. शिवराज काटकर यांचे... तुम्ही पत्रकारितेच्या प्रवाहात या. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी... हा त्यांनी दिलेला विश्वास माझ्यासाठी मोलाचा ठरला...

ई-दैनिक सांगली समाचार हे केवळ बातम्या देणारे न्यूज वेबपोर्टल न राहता, त्याही पलिकडे आमची जबाबदारी असेल. एक दर्जेदार, विश्वसनीय सामाजिक व्यासपीठ म्हणून याची ओळख निर्माण करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. दैनंदिन घडामोडींवर प्रकाशझोत टाकतानाच, समाजाला आवश्यक असणारी उपयुक्त आणि नाविन्यपूर्ण माहिती आम्ही प्रकाशित करणार आहोत... इतरही खूप काही आणि आनंददायक वाचनीय माहितीचा खजिना आपल्यासाठी उपलब्ध करून देऊ...

असो, सांगली समाचार या आकर्षक, देखण्या वेबपोर्टलची निर्मिती भिलवडी येथील श्री. अमोल वंडे या ध्येय्यवेड्या तरूणाने निस्वार्थ भावनेतून केलेली आहे. त्यांच्याच सल्ल्याने दैनिक सांगली समाचार ई-दैनिकाची वाटचाल सुरू रहाणार आहे...

आता जबाबदारी आहे ती आमच्या हितचिंतक व वाचकांची... स्व. एन. सरडे अर्थात आमचे आण्णा यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून, सुरू केलेल्या या नव्या प्रवासात आम्हाला आपली भक्कम साथ अपेक्षित आहे...
चला तर मग सोबत... व्हा तैय्यार...
एका नव्या प्रवासात आपली नियमित भेट होणारच आहे... हा प्रवास सर्वांनी मिळून अधिकाधिक आनंददायक बनवूया !...