Sangli Samachar

The Janshakti News

गोळीबाराच्या घटनांवर मुख्यमंत्री आक्रमक





सांगली समाचार  दि. १२|०२|२०२४

नागपूर : राज्यात होत असलेल्या गोळीबारावरून राज्यातील महायुतीच्या सरकारला विरोधक चहुबाजूने घेरत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रामटेक येथील नेहरू मैदानात आयोजित शिव संकल्प कार्यकर्ता मेळाव्याच्या कार्यक्रमात त्यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधत त्यांच्या कार्यकाळातील घटनांवरून हल्लाबोल केला. तसेच, राज्य सरकार गुन्हेगारांना ठेचणार, असे ठणकावूनही सांगितले.

मोहोळ, गायकवाड, आणि घोसाळकर गोळीबार प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्यात गुंडाराज चालू असल्याचा घणाघात विरोधकांकडून केला जात आहे. विरोधकांच्या या टीकेला मुख्यमंत्र्यांनी या सभेतून उत्तर दिले. ते म्हणाले, ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी 40 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण केले आणि त्यांना सगळ्यांनी साथ दिली. त्याचप्रमाणे आपण पुढे जात आहोत. शिवसेनेत फूट पाडून एकनाथ शिंदेंनी वेगळी चूल मांडल्यापासून उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दात टीका करतात. त्यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच भाषेत उत्तर देत असतात.




यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी अभिनेत्री कंगना राणावतचे उदाहरण देत ठाकरेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्री म्हणाले, तुमचे सरकार असताना तुम्ही कंगना राणावतचे घर पाडले. गृहमंत्र्यांनी खंडणी मागितली. तर आम्ही धनुष्यबाण वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मी चुकीचे केले असते तर इतके लोक आले असते का, असा सवाल केला.