Sangli Samachar

The Janshakti News

कुपवाड येथे ३०० कोटीचे ड्रग्ज जप्त

सांगली समाचार  - दि. २२|०२|२०२४

सांगली - पुणे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व कुपवाड पोलिसांच्या पथकाने कुपवाडमधील स्वामी मळ्यातील एका पत्र्याच्या खोलीवर छापा टाकून १४० किलो एमडी ड्रग्ज जप्त केले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे अडीचशे ते तीनशे कोटी रुपये किंमत आहे. मंगळवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मुख्य तस्कर आयुब अकबरशा मकानदार (वय ४४, रा. बाळकृष्णनगर, कुपवाड) याच्यासह तिघांना अटक करण्यात आली. खोली मालक रमजान हमीद मुजावर (५५, नूर इस्लाम मस्जिदजवळ, कुपवाड) व अक्षय चंद्रकांत तावडे (३०, बाळकृष्णनगर, कुपवाड) अशी अटक केलेल्या अन्य दोघांची नावे आहेत.

पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी विश्रांतवाडी, कुरकुंभ व दिल्ली येथे केलेल्या कारवाईत दोन हजार दोनशे कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. त्याचे वजन अकराशे किलो होते. त्या कारवाईत चार संशयितांना अटक केली होती. त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी कुपवाडमधील दोघांची नावे निष्पन्न झाली होती.

पुण्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कुपवाड पोलिसांशी संपर्क साधला. मंगळवारी रात्रीच गुन्हे अन्वेषणचे पथक कुपवाडमध्ये दाखल झाले. जिल्हा पोलिसप्रमुख संदीप घुगे यांची पथकाने भेट घेऊन तपासाबद्दल माहिती घेतली. त्यानंतर कुपवाड पोलिसांची मदत घेऊन पथकाने मध्यरात्री स्वामी मळा परिसरात एका पत्र्याच्या खोलीवर छापा टाकला. खोलीतून १४० किलो ड्रग्जचा साठा जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत अडीचशे ते तीनशे कोटी रुपये आहे. पंचनामा करून ड्रग्ज जप्त केले आहे. मुख्य तस्कर आयुब मकानदारसह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध रात्री उशिरा कुपवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे अन्वेषणचे पथक बुधवारी रात्री उशिरापर्यंत कुपवाडमध्ये तळ ठोकून होते. आणखी काही ठिकाणी ड्रग्ज लपवून ठेवल्याची पथकाला माहिती लागली आहे. त्यानुसार पथक मकानदारकडे चौकशी करीत आहे. त्याच्याकडून काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे.

येरवडा कारागृहात प्लॅन शिजला

सुरुवातीला काही किलोमध्ये सापडलेल्या ड्रग्ज प्रकरणाची चेन दोन हजार किलोपर्यंत पोहोचली. सुमारे सात ते आठ वर्षापूर्वी सांगली जिल्ह्यात सुरू असणाऱ्या ड्रग्ज फॅक्टरीचा पोलिसांनी नष्ट केली होती.. त्यावेळी एका नामांकीत कंपनीच्या मालकासह आयुबलाही अटक केली होती. याप्रकरणी तो पुण्यातील येरवडा कारागृहात होता. तो तुरुंगात गेल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू असणारा ड्रग्जचा पुरवठा बंद होता. पुण्यातही छोटेमोठ्या कारवाईमध्ये सापडलेले गुन्हेगार येरवडा कारागृहात होते. ड्रग्ज प्रकरणी पोलिसांनी अटक केलेले संशयित आणि आयुबची ओळख येरवडा कारागृहातच झाली होती. तो ड्रग्ज पेडलर असल्याने पुण्यातील संशयितांनी त्याच्याशी सलगी वाढविली होती. त्यांनी ड्रग्ज तस्करीचा प्लॅन येरवडा कारागृहात ठरविला. त्यानंतर सहा महिन्यापूर्वी तो येरवडा कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. बाहेर येताच कारागृहातील प्लॅनप्रमाणे संशयितांकडून ड्रग्ज तस्करीचा बाजार मांडला होता. पुण्यातील ड्रग्ज टोळीलाही पुण्यापासून सुरक्षित ठिकाणी ड्रग्जचा साठा करायाचा होता. जेणे करून पुणे पोलिसांच्या हाती तो लागू नये, यासाठी प्लॅन केला होता. पुण्यातील साठा विविध ठिकाणी ठेवण्याचा संशयितांनी प्लॅन आखला. यामध्ये आयुबदेखील सहभागी होता. पुण्यातील संशयितांनी त्याच्याकडे तब्बल ३०० कोटी रुपयांचे ड्रग्ज दिले. ते पुण्यापासून दूर लपवून ठेवण्याची जबाबदार आयुबची होती. त्यासाठी त्याने सांगली जिल्हा गाठला.  कुपवाड शहरामध्ये असणाऱ्या स्वामी मळ्यातील अत्यंत अडगळीच्या ठिकाणी असणाऱ्या दहा बाय दहाची खोली निवडली. तेथे साठा ठेवलेला. पुणे पोलिसांनी पुण्यातील ड्रग्ज तस्करीचा भाडांफोड केल्यानंतर सांगली पुन्हा ड्रग्ज तस्करी प्रकरणी चर्चेत आली. पुणे पोलिसांनी कुपवाडमध्ये मध्यरात्री दोन वाजता सुरू केलेली कारवाई १६ तास लोटले तरी सुरूच होती. पुण्यातील ड्रग्ज कुपवाडमधील स्वामी मळ्यात का ठेवला होता ? येथून ड्रग्जचा पुरवठा कोठे कोठे करण्यात येत होता ? आयुबसोबत अटक केलेल्या अन्य दोघांची यामध्ये कोणती भूमिका आहे? याचीही पुणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून कसून चौकशी केली. यातून आणखीन धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. 

पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर ड्रग्जचा साठा

कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर आयुबने ड्रग्जचा बाजार मांडलेला. या ठिकाणी त्याने साठा केलेला. २० ते २५ दिवसांपूर्वीच हा साठा या ठिकाणी आणल्याची माहिती मिळाली. साठा करण्यासाठी तो कुपवाड परिसरातील अन्य काही ठिकाणांचाही वापर करीत होता. तेथेही पुणे पोलिसांनी छापेमारी करून तपासणी केली. यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.