Sangli Samachar

The Janshakti News

दुष्काळात जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न दुर्लक्षित

सांगली समाचार  - दि. २७|०२|२०२४

सांगली - सांगली जिल्ह्यात मध्यम दुष्काळ जाहीर झाला असून जत, आटपाडी तालुक्यांतील काही गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. टॅंकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी अजूनही येत आहे.परंतु टॅंकरने पाणी देताना जनावरांचा हिशेबच धरला जात नाही. त्यामुळे पुरेसे पाणी मिळत नाही. त्यातील सत्तर टक्‍क्‍यांहून अधिक जनावरे माणसाच्या वाट्यातील पाण्यावर जगवली जात आहेत. जनावरांना पाणी कसे उपलब्ध करायचे असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे. त्यामुळे जनावरांना पाणी द्या, अशी मागणी करत असले तरी, याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये या वर्षी टंचाई जाहीर करण्यात आली आहे. त्यांपैकी जत आणि आटपाडी तालुक्यांतील सिंचनापासून वंचित गावांतील स्थिती गंभीर आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी केली जात आहे. सध्या दोन तालुक्यांतील ५७ गावांमध्ये आणि लगतच्या ४०० वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सुमारे सव्वा लाख लोक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. दिवसेंदिवस पाणीटंचाई वाढत आहे. त्यामुळे अनेक भागांतून पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू करावेत, अशी मागणीही होऊ लागली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन टॅंकरद्वारे पाण्याची सोय करण्याचे नियोजनही करत आहे.

आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव या तालुक्यांत पाणीटंचाई आहे. पण टेंभू, ताकारी आणि म्हैसाळचे पाणी असल्याने आटपाडी आणि जत तालुका वगळता जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे जत आणि आटपाडी तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू आहेत. टँकरने पाणी देताना त्या गावातील लोकवस्ती मोजली जाते. त्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो. आटपाडी तालुक्यात लहान-मोठी १,४९,८१७ तर जत तालुक्यात ३, ५४, ७६५ जनावरांची संख्या आहे.

एका मोठ्या जनावराला प्यायला रोज ६० लिटर पाणी लागते. लहान जनावरांना २० ते ३० लिटर पाणी लागते. साऱ्यांत जनावरांचे प्रचंड हाल होत असल्याचे लोक सांगतात. कारण, टॅंकर येतो माणसांसाठी. त्यातही तुटवडा. जनावरांची मोजदाद कोण करतो, त्यामुळे जनावरांना पाणीच मिळत नसल्याने पाणी कुठून द्यायचे, असा प्रश्न पशुपालकांना पडत आहे. जनावरांना टॅंकरने पाणी देण्यासाठी प्रशासनाने कानाडोळा केला असल्याने पशुपालकांमधून संताप व्यक्त होत आहे.