सांगली समाचार दि. २६|०२|२०२४
वाशिम - जि. प. शाळेत शिक्षण घेऊन शास्त्रज्ञ होण्यापर्यंतचे शिक्षण पूर्ण करीत साकारलेल्या पेटंटला भारत सरकारची मंजुरी मिळवित शास्त्रज्ञ होण्याचा बहुमान पटकावला. त्यामुळे येथील शेतकरी कुटुंबातील मुलाच्या कामगिरीचे कौतुक होऊ लागले आहे. पुरुषोत्तम शेषराव कावरखे याचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने जि. प. शाळेशिवाय दुसरा पर्याय नव्हता. प्राथमिक शिक्षण पहिले ते दहावी जि. प. शाळा गोरेगाव येथेच पूर्ण केले. नंतर पुढील शिक्षणासाठी पुरुषोत्तम याने वाशिम येथे प्रवेश घेत इयत्ता बारावी व ऑटोमोबाइल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासून यांत्रिकीकरण आणि नवनवीन उपक्रम साकारण्याची आवड असल्याने अभ्यास करणे सुरू केले. यश पदरात पाडून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत मिरची देठ कटिंग यंत्राची ओळख करून ते भारत सरकारच्या स्वाधीन केले, यावर भारत सरकारने अभ्यास करून २१ फेब्रुवारी रोजी 'मिरची स्टेम कटिंग मशीन' या यंत्रास मान्यता दिली.
लहानपणापासून शेतीमध्ये येणाऱ्या अडचणींची आधीपासून जाणीव होती. त्यातूनच मिरचीचे देठ वेगळे करत असताना मुख्यत्वेकरून महिला कामगारांच्या आरोग्यावर मिरचीचा होत असलेला परिणाम लक्षात घेऊन यांत्रिकीकरणाची जोड देऊ शकतो, असा विचारही या विद्यार्थ्याने केला. सदर गोष्टीवर सातत्याने प्रयोग करत २०१६ मध्ये संशोधन करत असताना समाधानकारक परिणाम हाती आला. या अगोदर महिला कामगाराद्वारे मिरची देठ काढण्यामध्ये साधारण दिवसाला १० किलोपर्यंत काम केले जात होते. आता मशीनद्वारे अंदाजे चार ते पाच हजार किलोपर्यंत दिवसाला काम केले जाणार आहे. त्यासाठी हे संशोधन नामांकन करण्यासाठी भारत सरकारच्या पेटंट विभागाकडे २०१६ मध्ये देण्यात आले होते.चार देशांनी केला होता दावा....
तब्बल ८ वर्षे सतत यावर भारत सरकार पेटंट विभागासोबत वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केला. त्यामध्ये बऱ्याच अडचणीला सामोरे जावे लागले. त्यातून मुख्यत्वेकरून कोरिया देशामधून दोन, जपान देशामधून एक आणि चीनमधून एक अशा एक नाही तर चार-चार देशांनी यावर दावा केला होता. सततच्या अभ्यासातून त्यांचा दावा फेटाळत शेवटी यावर मात करत संशोधन आपल्या नावावर करण्यात यश आले. यानंतर आता भारत सरकार पेटंट विभागाद्वारे 'मिरची देठ' काढण्याचे यंत्राचे संशोधन कायमस्वरूपी पुरुषोत्तम शेषराव कावरखे गोरेगावकर याच्या नावावर करण्यात आले.
'बायो बाईक'चा केला प्रयोग...
या अगोदर इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी 'बायो बाईक' नावाने यशस्वी प्रयोग केला होता. यामध्ये शेतातील 'गोबरगॅस' वरती मोटारसायकल चालवण्याचा प्रयोग पूर्ण केला. सद्य:स्थितीत 'गोबरगॅस'वरून मोटारसायकलबरोबरच कार, ट्रॅक्टर चालविण्यासाठी लागणार गॅस एका छोठ्या यंत्राद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला टँकमध्ये घराच्या घरी साठवता यावा आणि त्यावर शेतीपयोगी आणि गृहोपयोगीबरोबर सर्व स्वयंचलित यंत्रासाठी लागणारे इंधन आता प्रत्येकजण तयार करून शकेल, त्यामुळे शेतकऱ्यांचा पेट्रोल, डिझेल इंधनावरील बराच खर्च वाचणार आहे