Sangli Samachar

The Janshakti News

हे म्हणजे, काँग्रेसचे" बैल गेला झोपा केला" !

 



सांगली समाचार  - दि. १५०२|२०२४

मुंबई  - आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला लागलेले गळती थांबता थांबेना. यावर आता मनन करण्यासाठी चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रकार म्हणजे "बैल गेला झोपा केला" अशी टीका होऊ लागली आहे. दिग्गज काँग्रेस नेत्यांनी, पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेसमधील डॅमेज कंट्रोलसाठी आता काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी महाराष्ट्रात लक्ष घातले आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून पुण्यातील लोणावळा येथे काँग्रेसच्या चिंतन शिबाराचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते या शिबिराला उपस्थिती लावणार आहेत.

काँग्रेसची झालेली वाताहत, राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती आणि आगामी काळातील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. याचाच भाग म्हणून शुक्रवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी या चिंतन शिबिराचे उद्घाटन करणार आहेत.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आणखी काही आमदार आणि काँग्रेसचे नेते त्यांच्या समवेत भाजपमध्ये जाऊ शकतात, अशा चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याचाच भाग म्हणून लोणावळ्यात होणारे दोनदिवसीय चिंतन शिबिराकडे पाहण्यात येत आहे.



या चिंतन शिबिराला मलिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी हे ऑनलाइन उपस्थिती लावणार असून, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे 17 फेब्रुवारीला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. हे शिबिर राज्यातील 300 निमंत्रित काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसाठी असणार आहे.

या शिबिरादरम्यान शुक्रवारी सायंकाळी सगळ्या विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांची संध्याकाळी बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे चिंतन शिबिर अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. कारण काँग्रेसमध्ये होत असलेले आउटगोइंग आणि काँग्रेसच्या अंतर्गत नेत्यांमधील वाद यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी नैराश्याचे वातावरण निर्माण होत आहे.

या पार्श्वभूमीवरती या शिबिराच्या माध्यमातून काँग्रेस नेते एकजूट दाखवून आगामी निवडणुकांसाठी मोर्चे बांधणीला लागणार आहेत. यामुळे या शिबिरातून काँग्रेस एक नव्या उत्साहाने आगामी निवडणुकांच्या तयारीला लागेल असं मानलं जात आहे.