Sangli Samachar

The Janshakti News

सांगली जिल्हा नागरीक जाग्रुती मंच तर्फे "सांगली स्टेशन वाचवा" आंदोलन

 


सांगली समाचार  - दि. १७०२|३०२४

सांगली - सांगली जिल्हा नागरीक जाग्रुती मंच तर्फे " सांगली स्टेशन वाचवा" व "संपर्क क्रांती सांगलीत थांबवा" आंदोलन ता 27 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आले असून सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन सतीश साखळकर यांनी केले आहे.

सांगली हे पश्चिम महाराष्ट्र पुण्यानंतर दुसऱ्या नंबरचे सर्वात मोठे शहर असून जागतिक हळदी नगरी म्हणून सांगली शहर प्रसिद्ध आहे. सांगलीत बेदाणा, द्राक्षे, गुळ सोयाबीन व साखरेची देशातील प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. सांगली रेल्वे स्टेशन हळदी, गुळ, बेदाणा बाजारपेठेच्या शेजारीच असून शहराच्या सर्व परिसरातून मध्यवर्ती ठिकाणी आहे.पण सांगली शहरावर असणाऱ्या सूडबुद्धीमुळे मध्य रेल्वेच्या वरीष्ठ अधिकार्यांनी सांगली जिल्ह्यात 21 रेल्वे स्टेशन असताना देखील सर्वच गाड्या फक्त मिरज रेल्वे स्टेशन वरून सुरू व्हाव्या व सर्व येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्या देखील मिरज रेल्वे स्टेशनवरच थांबाव्यात असा अट्टाहास धरल्यामुळे सांगली शहरातील मध्यवर्ती रेल्वे स्टेशनची वाताहात झाली आहे. 

दिवसभर आजूबाजूच्या बेळगाव, हुबळी, धारवाड, गोवा, पंढरपूर, सोलापूर परिसरात जाण्यासाठी सांगली स्टेशनवरून रेल्वे गाड्या उपलब्ध नसल्याने सांगलीच्या बाजारपेठेवर खूप मोठा परिणाम झाला आहे. प्रत्येक रेल्वेगाडी पकडण्यासाठी सांगली शहरापासून 14 ते 20 किलोमीटर दूर असणाऱ्या मिरज जंक्शनवरच जावे लागते यामुळे सांगली जिल्ह्यातील जनतेचा बहुमूल्य वेळ व पैसा वाया जात आहे.  

सांगलीचा हा प्रचंड मोठा प्रश्न सोडवण्यासाठी सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचने गेल्या 5 वर्षांपासून पुढाकार घेतला असून गेल्या 5 वर्षात अनेक वेळा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घतली आहे. तसेच वेळोवेळी रेल्वेमंत्री, रेल्वे राज्यमंत्री तसेच मध्य रेल्वेच्या पुणे व मुंबई विभागातील अधिकाऱ्यांना सांगली स्टेशनच्या वेगवेगळ्या विषयांवर पत्र लिहून सांगली रेल्वे स्टेशनवरून रेल्वे गाड्या सुरू करणे तसेच प्रत्येक रेल्वेगाडीला सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागण्या रेल्वे अधिकाऱ्यांनी व रेल्वे मंत्र्यांनी मंजूर न केल्यास सांगली रेल्वे स्टेशनवर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचने दिला आहे. 

"सांगली रेल्वे स्टेशन वाचवा" व "संपर्क क्रांती सांगलीत थांबवा" हे दोन आंदोलन नागरीक जाग्रुती मंचने छेडले आहेत.

ता २७ फेब्रेवारी रोजी सांगली रेल्वे स्टेशन समोर रेल्वे राज्य मंत्र्यांच्या फोटोला काळे फासण्यात येईल व त्यांच्या प्रतिमेचे जाहीर दहन करण्यात येईल. त्यानंतर पदयात्रा सांगली रेल्वे स्टेशन वरून मार्केट यार्ड जाईल. मार्केट यार्ड चौकात नागरीक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर पदयाथ यात्रेतील तमाम नागरिकांना संबोधित करतील व आंदोलनाची पुढची दिशा सर्वानुमते ठरवण्यात येईल.

जागृती मंचच्या मागण्या

1) गाडी क्र 16589/16590 बेंगलोर-मिरज रानी चेनमा एक्सप्रेसचे सांगली स्टेशन पर्यंत विस्तार करणे

2) गाडी क्र 11411/11412 परळीवैजनाथ-मिरज डेमू एक्सप्रेसचे सांगली स्टेशन पर्यंत विस्तार करणे

3) गाडी क्र 01413/01414 निजामाबाद-पंढरपूर एक्सप्रेस गाडीचे सांगली स्टेशन पर्यंत विस्तार करणे व त्याला हळदी नगरी एक्सप्रेस नाव देणे

4) गाडी क्र 01545/01546 कुर्डूवाडी-मिरज डेमू गाडीचे सांगली स्टेशन पर्यंत विस्तार करणे

5) गाडी क्र 01543/01544 कोल्हापूर-मिरज डेमू गाडीचे किर्लोस्करवाडी स्टेशन पर्यंत विस्तार करणे

6) गाडी क्र 22685/22686 चंडीगड-यशवंतपूर संपर्क क्रांती व 12629/12630 कर्नाटक संपर्क क्रांती गाड्यांना सांगली स्टेशनवर थांबा देणे.

7) सांगली स्टेशनमध्ये 3 प्लॅटफाॅर्म दिवसभर रिकामे असतात जिथून या गाड्या सोडता येतील. तसेच जवळील मिरज जंक्शन येथील पिट लाईन, गाडीत पाणी भरण्याची सुविधा व ईंजिन ड्रायवरची रनिंग रूम सुविधा सांगलीपर्यंत विस्तारीत होणाऱ्या गाड्यांसाठी वापरता येईल.