Sangli Samachar

The Janshakti News

पाण्याची मागणी वाढली; कोयनेच्या आपत्कालीन द्वारमधून सोडले पाणी

 

सांगली समाचार  - दि. २५|०२|२०२४

सांगली - महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणात ६७ टीएमसी साठा असून पाण्याची मागणी सतत होत आहे. त्यातच आता सांगली पाटबंधारे विभागाकडूनही सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्याने धरणाच्या आपत्कालीन द्वारमधून ५०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या सांगलीसाठी पायथा वीजगृह २१०० आणि द्वारामधील ५०० असा एकूण २६०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सर्वाधिक धरणे आहेत. कोयना, धोम, बलकवडी, तारळी, कण्हेर, उरमोडी अशी काही मोठी धरणे आहेत.

या धरणांची पाणीसाठवण क्षमता सुमारे १४८ टीएमसी इतकी आहे. दरवर्षी जून ते सप्टेंबरपर्यंतच्या पावसाळ्यात ही धरणे भरतात. त्यामुळे वर्षभराचे सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन करता येते. मात्र, गेल्यावर्षी जिल्ह्यातच पर्जन्यमान कमी झाले. वार्षिक सरासरीच्या ७० टक्क्यांहून कमी पाऊस पडला. त्यातच कोणत्याही तालुक्याने १०० टक्केचा टप्पाही गाठला नाही. त्यामुळे गेल्यावर्षी ऑक्टोबरपासूनच जिल्ह्यात पाणीटंचाई आहे. तर पाऊस कमी पडल्याने कोयनेसह मोठी धरणे भरली नाहीत. मात्र, या धरणांवर विविध सिंचन योजना अवलंबून आहेत. तसेच शेकडो गावांची तहानही भागत आहे.

त्यामुळे सध्या कोयनेतील पाण्यासाठी मागणी वाढली असल्याने विसर्ग करावा लागत आहे. कोयना धरणातून सांगलीसाठी पाणी सोडण्यात येत होते. पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू करुन २१०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते, पण सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी जादा पाणी सोडण्याची मागणी झाली. त्यामुळे मंगळवारी आपत्कालीन द्वार खुले करण्यात आले. त्यातून ५०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली.

३१ मेपर्यंत पाण्याचे नियोजन करावे लागणार..

- कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. गेल्यावर्षी धरण ९५ टीमएसीपर्यंतच भरले होते. सध्या धरणात ६७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

- हे पाणी ३१ मी पर्यंत पुरवावे लागणार आहे. या धरणातील पाण्यावर महत्त्वाच्या तीन सिंचन योजना अवलंबून आहेत. यात टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या सिंचन योजनांचा समावेश आहे. या योजनांसाठी पाणी विसर्ग करण्यात येतो. त्यातून शेकडो हेक्टर शेतीला फायदा होतो.