Sangli Samachar

The Janshakti News

समुद्र किनाऱ्यावर आढळले भल्या मोठ्या पावलांचे ठसे... अन्...




सांगली समाचार | दि. ०७ | ०२ | २०२४

माणसांचं पृथ्वीवर नेमकं कधीपासून अस्तित्व आहे, माणसांचे पूर्वज कोण होते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अद्याप पूर्णपणे आणि ठोस उलगडलेली नाहीयेत. त्यामुळे या संदर्भात सुरू असलेल्या शोधांमधून एखादी नवी गोष्ट समोर आली, तर आपण चकित होतो.

गेल्या ऑक्टोबरमध्ये अमेरिकी शास्त्रज्ञांनी असा दावा केला होता, की न्यू मेक्सिकोमध्ये त्यांना मानवी पावलांचे सर्वांत जुने ठसे सापडले आहेत. ते ठसे 23 हजार ते 21 हजार वर्षं जुने आहेत, असं सांगण्यात येत होतं; मात्र आता त्या संदर्भातली आणखी एक मोठी घडामोड घडली आहे. मोरोक्कोमधल्या लाराचे इथल्या समुद्राच्या किनाऱ्यावर फिरत असलेल्या शास्त्रज्ञांना त्याहूनही मोठे असे पावलांचे ठसे सापडले आहेत. त्या ठशांची तपासणी केली असता, आश्चर्यकारक बाबी उघड झाल्या आहेत.

लाइव्ह सायन्सने या संदर्भातला एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे. फ्रान्सिसी युनिव्हर्सिटीतल्या शास्त्रज्ञांचा एक गट लाराचेमध्ये समुद्रकिनाऱ्यावर फिरत होती. तेव्हा त्यांना हे मोठ्या पावलांचे ठसे दिसले. त्यांची तपासणी केली असता असं लक्षात आलं, की हे दुसऱ्या-तिसऱ्या कोणत्या प्राण्याच्या नव्हे, तर माणसाच्या पावलांचे ठसे आहेत. हे ठसे 90 हजारांहून अधिक वर्षांपूर्वीचे आहेत. हे समजल्यानंतर शास्त्रज्ञांना आश्चर्य वाटलं. कारण आतापर्यंत एवढे मोठे आणि जुने मानवी पावलांचे ठसे सापडले नव्हते.

शास्त्रज्ञांच्या टीमचं नेतृत्व करणारे शास्त्रज्ञ मौंसेफ सेड्राती यांनी सांगितलं, की होमो सेपियन्स हजारो वर्षांपूर्वी उतार असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर चालले होते, हे यातून सिद्ध होतं. समुद्राच्या लाटांचा जोर कमी असताना हे ठसे सापडले. आमची टीम समुद्रात खूप आतपर्यंत गेली होती. पहिला ठसा पाहिल्यावर आम्हाला आश्चर्य वाटलं. हा पावलाचा ठसा असल्याबद्दलच आम्हाला खात्री वाटली नाही; मात्र नंतर आम्हाला आणखी काही ठसे सापडले. हे ठसे किती जुने आहेत याचा शोध लावण्यासाठी आम्ही ल्युमिनसेन्स डेटिंगचा वापर केला. याचा अर्थ असा आहे, की मानव फार पूर्वीपासून जमिनीवर राहत होता आणि आपल्याप्रमाणेच फिरत होता. उत्तर आफ्रिका आणि दक्षिण भूमध्य सागराच्या प्रदेशातला ही या प्रकारची एकमात्र ज्ञात मानव ट्रॅकवे साइट बनली आहे.

सायंटिफिक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या नव्या अभ्यासातल्या माहितीनुसार, पावलांचे 85 ठसे सापडले आहेत आणि त्यावरून असं वाटत आहे, की पाच व्यक्ती एकत्र चालत असाव्यात. कारण त्यांच्या चालण्यातून पाच ट्रेल्स (वाटा) तयार झाल्या आहेत. त्यात लहान मूल, किशोरवयीन आणि प्रौढ व्यक्तीचा समावेश आहे. ठसे किती जुने आहेत हे तपासण्यासाठी शास्त्रज्ञांनी ऑप्टिकली स्टिम्युलेटेड ल्युमिनसेन्स डेटिंग तंत्राचा वापर केला. कोणतीही कलाकृती किंवा तिच्या आजूबाजूची खनिजं सूर्यकिरणांच्या किंवा उष्णतेच्या संपर्कात शेवटची कधी आली होती, हे त्या तंत्रातून कळतं. त्या आधारे शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला, की सुमारे 90 हजार वर्षांपूर्वी होमो सेपियन्सचा वेगवेगळ्या वयोगटातला समूह समुद्रकिनाऱ्यावर चालला होता. त्यांच्या चालण्यामुळे पाऊलवाट तयार झाली होती. लेट प्लीस्टोसीन अर्थात अंतिम हिमयुग समजल्या जाणाऱ्या काळात ही घटना घडली होती, असा निष्कर्ष काढण्यात आला. हे युग सुमारे 11,700 वर्षांपूर्वी संपलं होतं.