Sangli Samachar

The Janshakti News

निखिल वागळे यांच्यावरील हल्ला : राज्यातील पत्रकार संघटनांची 21 फेब्रुवारी रोजी मुंबईत बैठक

 


सांगली समाचार - दि. १३|०२|२०२४

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला आणि एकूणच राज्यातील पत्रकारांवरील वाढते हल्ले या संदर्भात ठोस आणि निर्णायक भूमिका घेण्यासाठी राज्यातील प्रमुख पत्रकार संघटनांची महत्वाची बैठक 21 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात होणार असल्याची घोषणा एस.एम.देशमुख यांनी केली..

निखिल वागळे यांच्यावर पुण्यात झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज मुंबई मराठी पत्रकार संघात निदर्शने करण्यात आली.. यावेळी मुंबईतील सर्व प्रमुख पत्रकार संघटना सहभागी झाल्या होत्या..

निखिल वागळे यांच्यावरील हल्ला म्हणजे माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आहे..या विरोधात सर्व पत्रकार संघटनांनी एकजूट कायम ठेवण्याची गरज सर्वच वक्त्यांनी व्यक्त केली.. निखिल वागळे यांच्या प्रमाणेच राज्यात गेल्या सहा महिन्यात 36 पत्रकारांवर हल्ले झाले असून निवडणुकांच्या काळात असे हल्ले वाढणार आहेत.. या विरोधात केवळ निषेध करून चालणार नाही तर काही ठोस भूमिका घ्यावी लागेल अशी सूचना बहुतेक वक्त्यांनी केली.. त्यानुसार विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी राज्यातील प्रमुख पत्रकार संघटनांची २१ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी २ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात बैठक घेण्यात येणार आहे..या बेठकीत आंदोलनाचा पुढील दिशा ठरविली जाईल.. 

आजच्या निदर्शने आंदोलनास जोरदार प्रतिसाद मिळाला.. या आंदोलनात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई मराठी पत्रकार संघ, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए, मुंबई प्रेस क्लब, म्हाडा पत्रकार संघ, क्राईम रिपोर्टर असोशिएशन, बृहन्मुंबई महापालिका पत्रकार संघाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते..यावेळी काही सामाजिक संघटना,कामगार संघटनानी सहभागी होत आंदोलनास पाठिंबा दर्शविला.. निदर्शकांनी गगनभेदी घोषणा दिल्या..

एस.एम.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निषेध सभेत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, कार्यवाह संदीप चव्हाण, विश्वस्त राही भिडे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरबीरसिंग, जतीन देसाई, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यवाह प्रवीण पुरो, मुंबई क्राईम रिपोर्टर असो.चे शाहिद अन्सारी, म्हाडा पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक पवार, मुंबई महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष विष्णू सोनावणे तसेच ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई, युवराज मोहिते, संजीव साबडे,संजय परब, एनडीटीव्हीचे मिश्रा आदिंनी निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला.. हे आंदोलन दोन तास चालले.. कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज राज्यात अनेक ठिकाणी पत्रकार संघटनांनी आंदोलनं करून निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे..आजच्या निदर्शनात अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टिवकर,(रायगड) मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, मुंबई मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षा स्वाती घोसाळकर आणि विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.