| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. ३ ऑगस्ट २०२५
जैन समाजाच्या सर्वागीण प्रगतीसाठी गेली १२६ वर्षे दक्षिण भारत जैन सभा कार्यरत आहे. या संस्थेचे 'प्रगती आणि जिनविजय' हे नियतकालिक शंभर वर्षाहून अधिक काळ जैन समाज संघटन व परिवर्तनाचे कार्य करीत आहे. या पत्राचे संपादक म्हणून मुंबई इलाख्याचे अर्थमंत्री व छ. शाहू चरित्रकार स्व. दिवाण बहादूर आण्णासाहेब लठ्ठे, सांगली संस्थानचे माजी पंतप्रधान बाबगोंडा भुजगोंडा पाटील, ख्यातनाम कायदेपंडित स्व. केशवराव चौगुले, सत्यवादीकार बाळासाहेब पाटील, स्व. प्राचार्य जी. के. पाटील, स्व. सुभाषचंद्र अक्कोळे, ज्येष्ठ समाजसेवक डॉ महावीर अक्कोळे व अनेक विद्वान कर्तबगार जैन नेत्यांनी लक्षवेधी काम केले आहे.अशा महत्वपूर्ण प्रगती आणि जिनविजय या नियतकालिकेचे मुख्य संपादक म्हणून वाणीभूषण, विचारवंत लेखक आणि वक्ता प्रा. एन.डी.बिरनाळे यांची दक्षिण भारत जैन सभेच्या हारुगेरी येथील अधिवेशनात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत एकमताने निवड करण्यात आली.
प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी गेल्या ४० वर्षात चार हजारहून अधिक व्याख्याने दिली आहेत. वर्तमानपत्रात व सोशल मिडियावर त्यांचे हजारो लेख प्रसिद्ध झाले आहेत. वाचकांच्या काळजाला हात घालून परिवर्तन करण्याची ताकद त्यांच्या लेखणीत आहे.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, प्र. के. अत्रे, प्राचार्य जी. के. पाटील,सत्यवादीकार बाळासाहेब पाटील, वा. रा. कोठारी,डॉ. रावसाहेब पाटील यांच्या पत्रकारितेचा त्यांच्या लेखणीवर प्रभाव दिसून येतो. वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या प्रेरणेतून त्यांनी १९८३ मध्ये प्रगतीत लेखन सुरु केले. वरचेवर त्यांचे लेखन या पत्रातून प्रसिद्ध होत राहिले आहे. दै. सत्यवादी कोल्हापूर आणि दै. अग्रदूत मध्ये त्यांनी पत्रकार म्हणून काही काळ काम केले आहे. त्यांची लेखणी सडेतोड आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समाज प्रबोधन करणारी आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राष्ट्रीय, कृषी व आर्थिक, महिला उन्नती, साक्षरता,पर्यावरण व संविधान संरक्षण,तीर्थंकर महात्म्य, बेरोजगारी, विविध धर्म तत्वज्ञान, थोर पुरुष, युवा कल्याण इ. विषयावर त्यांची अनेक व्याख्याने झाली आहेत. ते गेली चाळीस वर्षे दक्षिण भारत जैन सभेच्या कामाशी निगडित आहेत. त्याचे शिक्षण कमवा आणि शिका योजनेतून झाले आहे. शिक्षक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी गेल्या तीस वर्षांत अनेक आंदोलने केली आहेत.
वीर सेवा दल मध्यवर्ती समितीच्या प्रशासन व संघटन कार्यात त्यांनी या युवा संघटनेचे प्रशासन व संघटन मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या कार्याचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचा मानद अधीक्षक म्हणून त्यांनी आठ वर्षे केलेले काम संख्यात्मक आणि गुणात्मक विकासाची साक्ष मानावी लागेल. ते शिक्षण संस्था चालक संघटनेच्या राज्य, विभागीय आणि जिल्हा स्तरावर काम करत आहेत.
मुख्य संपादक म्हणून निवड झाल्यावर त्यांच्याशी संपर्क होताच ते म्हणाले, "दक्षिण भारत जैन सभेचे काम जैन समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचवून सभेला स्थिर व समाजमान्य करायचे काम प्रगती जिनविजयने केले आहे. समाजातील कालबाह्य रुढी परंपरा नष्ट करुन समाजाला सम्यकत्वाचा मार्ग दाखवण्याचे ऐतिहासिक काम प्रगतीचे आहे. आज समाजासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. समाजऐक्यावर अधिक काम करावे लागेल. तीर्थक्षेत्रं,मठपरंपरा साधू- साध्वी, मंदिरं यांच्या संरक्षणाचे प्रश्न आहेत . शिक्षण, संस्कार आणि आरोग्य ही सभेची त्रिसूत्री अधिक मजबूत करण्यासाठी प्रगती हे उपयोगी माध्यम आहे. त्यासाठी काम करुन जैन समाज आणि दक्षिण भारत जैन सभा यांच्या प्रगतीचे मार्ग प्रशस्त करण्याचा प्रयत्न करत राहणार आहे. जैन समाजात घरटी एक प्रगती आणि घरातील लोक दक्षिण भारत जैन सभेचे सदस्य हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रगतीची भूमिका अग्रेसर राहील. प्रगतीचे चाक कायम जैन समाजाच्या सर्वागीण प्रगतीसाठी फिरत राहणार त्यासाठी सभेच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहू.
प्रा. एन.डी.बिरनाळे यांच्या रुपाने सभेच्या मुखपत्राला सशक्त वाणी, सृजनशील आणि परिवर्तनाची धमक असलेली लेखणी लाभली अशा प्रतिक्रिया समाजातून व्यक्त होत आहेत.