| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - शुक्रवार दि. २२ ऑगस्ट २०२५
महाराष्ट्रातील वीजग्राहकांसाठी महावितरणने "स्मार्ट टीओडी मीटर"च्या माध्यमातून नव्या तंत्रज्ञानाचा महत्त्वाचा टप्पा सुरू केला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने जाहीर केलेल्या पाच वर्षांच्या वीजदर आराखड्यानुसार, घरगुती ग्राहकांना दिवसाच्या ठराविक वेळेत वीज वापरावर विशेष सवलत लागू झाली आहे.
१ जुलै २०२५ पासून प्रत्यक्षात सुरू झालेल्या या योजनेचा मोठा लाभ कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ग्राहकांना मिळत आहे. जुलै-ऑगस्ट या दोन महिन्यांत सुमारे पाच लाखांहून अधिक ग्राहकांना एकूण ५६ लाख ५५ हजार रुपयांची बचत झाली आहे. केवळ जुलै महिन्यातच कोल्हापूरमधील ८९ हजार २३९ ग्राहकांनी ४.७९ लाख रुपये तर सांगलीतील ५० हजार ७२८ ग्राहकांनी २.६० लाख रुपयांची सवलत मिळवली. ऑगस्टमध्ये या आकड्यांमध्ये दुपटीने वाढ झाली असून, कोल्हापूरमध्ये ३० लाख २९ हजार तर सांगलीत १८ लाख ८८ हजार रुपयांचा आर्थिक लाभ ग्राहकांना झाला.
या स्मार्ट मीटरमुळे घरगुती वापरकर्त्यांना प्रत्यक्ष बचत तर मिळतेच, शिवाय दर अर्ध्या तासाला मोबाईलवर वीज वापराची माहिती पाहण्याची सोयही उपलब्ध आहे. त्यामुळे बिले अधिक पारदर्शक व अचूक ठरत असून, वापराचे नियोजन स्वतः ग्राहक करू शकतात. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वॉशिंग मशीन, गिझर, इस्त्री, एसी यांसारख्या जास्त विजेच्या उपकरणांचा वापर करून कुटुंबांना प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया इतकी बचत मिळणार आहे.
सन २०२५ ते २०३० दरम्यान ही सवलत टप्प्याटप्प्याने वाढणार आहे. जुलै २०२५ ते मार्च २०२६ पर्यंत ८० पैसे, २०२७ मध्ये ८५ पैसे, २०२८-२९ मध्ये ९० पैसे, तर २०३० मध्ये अखेरचा टप्पा म्हणून प्रतियुनिट १ रुपया सवलत लागू होईल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे मीटर मोफत बसवले जात असून, ग्राहकांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार येत नाही. ही प्रीपेड नव्हे तर पोस्टपेड पद्धतच कायम राहणार आहे. त्यामुळे वीज आधी वापरायची आणि नंतर मासिक बिल भरायचे ही विद्यमान सोय पुढेही सुरू राहील.
ग्राहकांना पारदर्शक बिलिंग, अचूक वीजमोजणी, सौर प्रकल्पांचा व्यवस्थित लेखाजोखा आणि खर्चावर अधिक नियंत्रण – हे सर्व फायदे एका स्मार्ट मीटरमुळे उपलब्ध होत आहेत. महावितरणच्या या उपक्रमामुळे घरगुती ग्राहकांसाठी "बचत आणि पारदर्शकता" युगाचा प्रत्यक्ष शुभारंभ झाल्याचे मानले जात आहे.