yuva MAharashtra सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जगातील सर्वोत्तम यंत्रणा व तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जगातील सर्वोत्तम यंत्रणा व तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे

| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - सोमवार दि. ११ ऑगस्ट २०२५

नागपूरमध्ये ‘गरुड दृष्टी’ या अत्याधुनिक सोशल मीडिया मॉनिटरिंग व सायबर इंटेलिजन्स प्रणालीचे महत्त्व अधोरेखित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, समाजविघातक प्रवृत्तींकडून सोशल मीडियाचा गैरवापर करून जातीय द्वेष पसरवला जातो, अफवा पसरवल्या जातात आणि त्यामुळे दंगलसदृश परिस्थिती निर्माण होते. अशा कारवायांना वेळीच आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडे आता जागतिक दर्जाची तंत्रज्ञान साधने उपलब्ध आहेत.

‘गरुड दृष्टी’ 

जलद शोध आणि तात्काळ कारवाई
नागपूर पोलिस भवन येथे झालेल्या सादरीकरण व सायबर आर्थिक गुन्ह्यातून वसूल झालेल्या सुमारे १० कोटी रुपयांच्या परतफेडीच्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. या निधीचे वाटप प्रत्यक्ष पीडितांच्या हाती करण्यात आले. या प्रसंगी पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

फडणवीस यांनी सांगितले की, मत व्यक्त करण्यासाठी सोशल मीडिया एक उत्कृष्ट व्यासपीठ असले तरी काही मंडळी त्याचा वापर हेट स्पीच, धमक्या, फेक न्यूज, अमली पदार्थ व्यवहार आणि आर्थिक फसवणूक यासाठी करतात. विशेषतः ऑनलाइन फसवणुकीच्या बहुतांश यंत्रणा परदेशातून चालवल्या जातात. नागरिकांनी मोबाईलवर येणाऱ्या आकर्षक ऑफरपासून सावध राहावे आणि फसवणूक लक्षात आल्यास तातडीने १९३० किंवा १९४५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले.

प्रणालीचा विस्तार होणार

सायबर हॅक २०२५ स्पर्धेतून जन्माला आलेली ‘गरुड दृष्टी’ ही कमी खर्चात तयार केलेली स्थानिक नवकल्पना असून, याचे बौद्धिक संपदा हक्क नागपूर पोलिसांकडे आहेत. ही प्रणाली केवळ गुन्हेगारी टाळण्यासाठीच नव्हे, तर सोशल मीडिया ट्रेंडचे विश्लेषण, संशयास्पद खाती शोधणे आणि त्वरित कारवाईसाठी उपयुक्त आहे. भविष्यात या साधनाच्या क्षमतेत अधिक वाढ केली जाणार आहे.

फसवणुकीच्या रकमांचा परतावा

तपास पूर्ण झाल्यानंतर परत करण्यात आलेल्या काही प्रमुख रकमा अशा —

रोहित अग्रवाल : ₹७३ लाख

शशिकांत परांडे : ₹३४.७७ लाख

देविदास पारखी : ₹३५.१५ लाख

विजय पाठक : ₹१९.९० लाख

विजय मेनपाणी : ₹१९ लाख

देवेंद्र खराटे : ₹१२.८१ लाख

राजमनी जोशी : ₹२९.९५ लाख

राहुल चावडा : ₹१५ लाख

बुद्धपाल बागडे : ₹१० लाख

आदित्य गोयंका : ₹२६.२० लाख

संगीता आष्टणकर : ₹८.२४ लाख
(ही नावे प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत.)

कार्यप्रदर्शनाचा आढावा

‘गरुड दृष्टी’ सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३० हजारांहून अधिक सोशल मीडिया पोस्ट्स तपासण्यात आल्या असून, त्यापैकी ६५० आक्षेपार्ह पोस्ट्स हटवण्यात आल्या आहेत. अफवा व द्वेषयुक्त मजकुरामुळे उद्भवणाऱ्या कायदा-सुव्यवस्था प्रश्नांना टाळण्यात या प्रणालीने मोलाची भूमिका बजावली आहे.