| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. १२ ऑगस्ट २०२५
सांगली व मिरज मुख्य टपाल कार्यालयांसह त्याअंतर्गत असलेल्या उपटपाल कार्यालयांमध्ये आता टपाल सेवेत मोठा बदल घडला आहे. १ सप्टेंबरपासून जवळपास शंभर वर्षांहून अधिक काळ नागरिकांचा विश्वास संपादन करणारी, कायदेशीर दृष्ट्या महत्त्वाची ‘नोंदणीकृत पत्र’ (रजिस्टर एडी) सेवा कायमची बंद करण्यात आली आहे. या पारंपरिक सेवेला निरोप देत, तिची जागा वेग, अचूकता आणि तंत्रज्ञानावर आधारित स्पीड पोस्टने घेतली आहे.
ब्रिटिश काळापासून सुरू असलेल्या या सेवेच्या माध्यमातून परीक्षा निकाल, न्यायालयीन समन्स, सरकारी आदेश, ग्रामसभा सूचना यांसारखे असंख्य महत्त्वाचे संदेश लोकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचत होते. अनेक पिढ्यांच्या आठवणी, नात्यांची जोड, आणि सरकारी व्यवहारांची शिस्त यामध्ये गुंफलेली होती. आता ही परंपरा काळाच्या पडद्याआड जात असली तरी, तिचा वारसा अधिक वेगवान आणि डिजिटल माध्यमातून पुढे नेण्याची जबाबदारी स्पीड पोस्टवर आली आहे.
वेग, पारदर्शकता आणि डिजिटल सोयी
एपीटी (APT) अॅप्लिकेशनमुळे टपालसेवा अधिक ग्राहकाभिमुख आणि सुलभ झाली आहे. स्पीड पोस्टच्या नव्या पद्धतीत:
प्रत्येक रजिस्टर पत्रासोबत प्राप्तकर्त्याला एक ओटीपी क्रमांक दिला जाईल. हा क्रमांक सांगितल्यावरच पत्र हस्तांतरित होईल.
पोस्टमन मोबाईलवर डिजिटल स्वाक्षरी घेईल.
प्राप्तकर्ता अनुपस्थित असल्यास त्या ठिकाणाचा फोटो पुरावा तयार करून पाठवणाऱ्यास कळवले जाईल.
ऑनलाईन ट्रॅकिंग सुविधेमुळे पत्राची सध्याची स्थिती तत्काळ तपासता येईल.
गरज पडल्यास हवाईमार्गानेही सेवा उपलब्ध
पोस्ट अधीक्षक बसवराज वालिकर यांनी सांगितले की, “ही सुधारित प्रणाली केवळ सेवेचा वेग वाढवणारी नाही, तर ती अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि आधुनिक गरजांना अनुरूप आहे.”
जुनी ‘नोंदणीकृत पत्र’ सेवा संपुष्टात येत असली तरी तिच्या आठवणी अनेकांच्या मनात कायम राहतील. आता मात्र पत्राचा प्रवास कागदावरून डिजिटलच्या वेगवान वाटेवर निघाला आहे — कालच्या विश्वासाला आजचा वेग लाभला आहे.