| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शुक्रवार दि. १५ ऑगस्ट २०२५
सांगली येथील शतकोत्तरी पांजरपोळ येथे गोकुळाष्टमी निमित्त आज भरगच्च धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच येथील श्रीकृष्ण मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. यानिमित्त घेतलेला आढावा.
श्री कृष्णा नदी काठावरील सांगली हे एक ऐतिहासिक आणि महान सांस्कृतिक परंपरा असलेले शहर आहे. या शहरामध्ये अनेक ऐतिहासिक संस्था आहेत. त्यापैकीच एक संस्था म्हणजे श्री पांजरपोळ संस्था होय. सांगलीतील शतकापूर्वीच्या अत्यंत महत्त्वाच्या संस्थांमध्ये श्रीपांजरपोळ संस्थेचा समावेश होतो. इ.स. १९११ मध्ये समाजातील सेवाभावी मंडळींनी श्री गोसेवेचे पवित्र उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्या संस्थेची स्थापना केली. गोसेवा हे प्रमुख उद्दिष्ट असल्याने संस्थेने ते आजपर्यंत निष्ठेने सांभाळले. हे कार्य करीत असतानाच संस्थेने सांगलीतील सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग घेतला आहे. सांस्कृतिक चळवळीला नेहमीच चालना दिली आहे.
श्री पांजरपोळ या संस्थेमध्ये गेली सुमारे ११३ वर्षे उत्तम पद्धतीचा गोठा श्रीकृष्ण मंदिराच्या सानिध्यात आहे. यामध्ये देशी खिलार आणि गीर जातीच्या गाईंचे आस्थापूर्वक आणि श्रद्धेने संगोपन केले जाते.
मकर संक्रात, आषाढी एकादशी, बेंदूर, गोकुळाष्टमी, वसुबारस, अन्नकोट असे विविध सण गोभक्तांकडून साजरे केले जातात. संस्थेच्या गोवर्धन सभागृहामध्ये अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम सातत्याने झाले आहेत आणि होत असतात. सांगली नगरपालिका, श्री गणपतराव आरवाडे हायस्कूल, सांगली नगरवाचनालय, सांगली चेंबर्स ऑफ कॉमर्स अशा अनेक नामवंत संस्थांचा प्रारंभ याच पांजरपोळ संस्थेच्या इमारतीत झालेला आहे. या सर्व संस्था अतिशय वर्धिष्णू स्वरूपात आजही कार्यरत आहेत. सांगलीतील सांस्कृतिक आणि सामाजिक तसेच धार्मिक चळवळीचे एक केंद्र म्हणून पांजरपोळ संस्थेकडे नेहमीच पाहिले जाते. हिंदी चित्रपट सृष्टीतील पितामह समजले जाणारे पृथ्वीराज कपूर हे सांगलीत नाट्य प्रयोगासाठी येत, तेव्हा त्यांचा मुक्कामही याच पांजरपोळ इमारतीत होई.
श्री कृष्णा नदी काठावर ११३ वर्षांहून अधिक काळ पांजरपोळ संस्थेतील गोठा व सभागृहाचे नूतनीकरण व अत्याधुनिकरण तसेच श्रीकृष्ण मंदिराचे जिर्णोद्धार असे प्रकल्प संस्थेने हाती घेतले आहेत. त्याचे बांधकाम सध्या गतीने सुरू आहे. हा एक प्रकारचा आदर्श गोठा करावा अशी संस्थेची इच्छा आहे.
धार्मिक प्रसंगी गाय वासरांची यथा-सांग पूजा व रोज गो चारा देता यावा व प्रदक्षिणा घालता यावी अशी या नवीन वास्तूंमध्ये सोय करण्यात आली आहे.
भाकड गाईंचा सांभाळ करणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे अनेक व्यक्ती तसेच शासनाच्या वतीने गोरक्षणासंदर्भात कायदेशीर कारवाई होते. त्यावेळी भाकड गाई व वासरे संस्थेकडे सोपविली जातात. केवळ सांगली जिल्ह्यातूनच नव्हे; तर आसपासच्या जिल्ह्यातूनही गाई आणि वासरे संस्थेकडे सांभाळण्यासाठी पाठवली जातात.
संस्थेकडे २२५ भाकड गाई आहेत. या सर्व गाई कृष्णा काठावरील पांजरपोळ संस्थेत व जुना बुधगाव रस्त्यालगतच्या गोठ्यात सांभाळल्या जातात. वखारभाग येथील गोठ्याच्यासुद्धा नूतनीकरणाच्या कामास लवकरच सुरुवात होत आहे.
शतकापूर्वी स्थापन झालेल्या संस्थेचे सर्व नवीन उपक्रम दानशूर व्यक्ती, तसेच सामाजिक व धार्मिक संस्था यांचे आर्थिक पाठबळ मिळेल या विश्वासाने घेतले आहेत. त्यामुळे नव्या उपक्रमांचा हा गोवर्धन गिरी उचलण्यासाठी आपण यथाशक्ती मनःपूर्वक हातभार लावावा अशी संस्थेची कळकळीची विनंती आहे. यासाठी पांजरपोळ संस्था कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.
गोसेवा-जनसेवा