| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. ९ ऑगस्ट २०२५
सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ट्रेमीमाइड नावाच्या औषधाचा नशेसाठी वापर करून विक्री करणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे. या कारवाईत एकूण ५५८ इंजेक्शन्स आणि एक दुचाकी मिळून २ लाख ६५ हजार २३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक केलेल्यांमध्ये अशपाक बशीर पटवेगार (५१, पत्रकार नगर, सांगली), यश संजय मोरे (२६, खणभाग, शांती नगर, सांगली), ओंकार प्रकाश कुबसद (२४, गणेश नगर, सांगली), दिलीप विश्वनाथ बंडगर (करोली टी, ता. कवठेमहांकाळ), तेजस शंकर हेळवी (नेलकरंजी, ता. आटपाडी) आणि अविनाश हणमंत रणदिवे (दिघंची, ता. आटपाडी) यांचा समावेश आहे.
‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत नशेच्या पदार्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणने विशेष पथक कार्यरत ठेवले आहे. या पथकाला अशी माहिती मिळाली की अशपाक पटवेगार हा पत्रकार नगरमधील गल्लीत इंजेक्शन विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार सहायक निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. संशयित दुचाकीवर (एमएच १० ईडी १७१) गोणी ठेवून आला असता त्याला थांबवून तपासणी केली असता ५४८ इंजेक्शन्स आढळली. चौकशीत त्याने ती इंजेक्शन्स ऑनलाईन मागवून जास्त किमतीत विक्री केल्याचे कबूल केले.
पटवेगारच्या कबुलीजबाबानुसार यश मोरे, ओंकार कुबसद यांच्याकडे काही इंजेक्शन्स दिल्याचे समोर आले. कुबसदच्या दुकानातून १० इंजेक्शन्स मिळाले, तर पुढील तपासातून दिलीप बंडगर, तेजस हेळवी आणि अविनाश रणदिवे यांच्यापर्यंत पोलिस पोहोचले. अखेरीस सहाही जणांना ताब्यात घेऊन इंजेक्शन्स आणि दुचाकी जप्त करण्यात आली.
ही कारवाई गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त जयश्री सवदत्ती तसेच पथकातील अनिल ऐनापुरे, अमोल ऐदाळे, बसवराज शिरगुप्पी, गुंडोपंत दोरकर, बाबासाहेब माने, इम्रान मुल्ला, अनंत कुडाळकर, सोमनाथ पतंगे, गणेश शिंदे, अभिजित पाटील, अजय पाटील आणि शांता कोळी यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली.