| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - शनिवार दि. ९ ऑगस्ट २०२५
देशातील विविध राज्यांतून हत्तींचे जामनगरच्या ‘वनतारा’कडे स्थलांतर गेल्या काही वर्षांपासून सुरूच आहे. प्रक्रिया नेहमीसारखीच – प्राण्यांच्या छळाविषयी ‘पेटा इंडिया’ तक्रार करेल, न्यायालयाने स्थापन केलेली उच्चस्तरीय समिती प्रकरण तपासेल, ‘हत्ती सुरक्षित नाही’ असा अहवाल येईल, विरोध झाला तर खटला पुन्हा न्यायालयात, आणि शेवटी निकाल काहीही असो – गंतव्यस्थान ठरेल वनतारा! पुदुच्चेरीतील ‘लक्ष्मी’ हत्तीणीसोबत असेच झाले होते; स्थानिक लोकांच्या दबावामुळे ती परत मंदिरात गेली, पण पेटाने लगेच नव्या याचिकेद्वारे तिची पुन्हा सुटका करण्याची मोहीम सुरू केली. त्यामुळे ‘महादेवी’ परत आली तरी पुढे काय घडेल, याबद्दल शंका कायम आहे.
आसाम, अरुणाचल, त्रिपुरा, राजस्थान, मध्यप्रदेश अशा राज्यांतून अनेक हत्ती हजारो किलोमीटरचा प्रवास करून वनतारात पोहोचवले गेले. वनताराचे व्यवस्थापन ‘राधा कृष्ण टेम्पल ट्रस्ट’कडे असून, २०१८ ते २०२० या कालावधीत ‘पेटा’ आणि ‘फेडरेशन ऑफ इंडियन ॲनिमल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन’च्या मोहिमेतून २९ हत्ती मुक्त झाले, आणि सर्वच येथे आले. पेटा म्हणते – प्राणी माणसाच्या करमणुकीसाठी नसतात; मात्र वनतारातील एक हत्ती अनंत अंबानींच्या लग्नात सजावटीसाठी वापरला गेला, त्यावर मात्र संस्था मौन बाळगते.
राजस्थानातील आमेर किल्ल्यात ‘मालती’ हत्तीण पर्यटक राईडसाठी वापरली जात होती. तिच्या आरोग्यविषयक तक्रारी, मारहाणीचे प्रकार, पायांच्या जखमा – हे सर्व पेटाच्या अहवालात होते. एप्रिल २०२४ मध्ये ती वनताराला रवाना झाली. हत्तीवर बसणं क्रौर्य, पण लग्नात घोड्यावर बसणं मात्र स्वीकारार्ह – हा विरोधाभास अनेकांच्या लक्षात आला.
सांगलीतील विटा गावातलं ‘गणेश’ हत्तीचं पिल्लू २००६ मध्ये केरळहून आणलं, २०२३ मध्ये उपचारासाठी वनताराला नेलं, पण त्याची पुढची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. अशा अनुभवांमुळे विश्वासाचा प्रश्न उपस्थित होतो.
पश्चिम बंगालमधील इस्कॉन मंदिरात माहुताच्या मृत्यूनंतर ‘विष्णुप्रिया’ व ‘लक्ष्मीप्रिया’ हत्तीणींना हिंसक झाल्याच्या कारणावरून मुक्त करण्यात आले. राज्यात नैसर्गिक अधिवास असतानाही त्या दोन हजार किमी दूर वनतारात का नेल्या, हा प्रश्न कायम आहे.
२०२२ मध्ये अरुणाचलमधून २० हत्ती – त्यात नर, माद्या व पिल्लं – लाकूडतोडीतून मुक्त होऊन वनतारात पोहोचले. मात्र मध्यप्रदेशातील अतिशय अशक्त ‘लक्ष्मी’ हत्तीण मात्र वनतारात न नेता उत्तर प्रदेशातील हत्ती संवर्धन केंद्रात ठेवली गेली – या अपवादामागील कारण गूढच राहते.
सध्या वनताराच्या ९९८ एकर जागेत २६० पेक्षा अधिक हत्ती असल्याचे संकेतस्थळावर नमूद आहे. पण गुजरात हा हत्तींचा नैसर्गिक अधिवास नसताना, एवढा मोठा ‘संग्रह’ का? प्राणी खरोखरच बरे व्हावेत, हा उद्देश असेल तर त्यांना पुन्हा अभयारण्यात वा राष्ट्रीय उद्यानात पाठवणे अधिक योग्य. परंतु मंदिरात किंवा मानवी सहवासात वाढलेले हत्ती अभयारण्यात टिकू शकतील का, हा मुद्दाही महत्त्वाचा.पेटा ही मूळ परदेशी संस्था असल्याने त्यांच्या काही मोहिमा भारतीय संदर्भात वादग्रस्त ठरल्या आहेत. एकेकाळी वादग्रस्त जाहिराती, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वनताराच्या उद्घाटनाला मिळालेलं प्रमोशन, आणि आता दक्षिण भारतातील मंदिर हत्तींकडे वळलेले प्रयत्न – हे पाहता ‘सोडवा हत्ती, पाठवा वनताराला’ ही मोहीम थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.महादेवी परत आल्याचा आनंद असला तरी, पुढील टप्प्यात काय घडू शकतं याबाबत जागरूक राहणं गरजेचं आहे.