yuva MAharashtra भाजपने गेअर बदलला? खासदार विशाल पाटलांचा एक एक बुरूज पाडण्यास सुरूवात

भाजपने गेअर बदलला? खासदार विशाल पाटलांचा एक एक बुरूज पाडण्यास सुरूवात

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. ९ ऑगस्ट २०२५

सांगलीत गेल्या काही दिवसांत भाजपने आपली राजकीय पकड वाढवण्यासाठी गती दिली असून, यासाठी काँग्रेससह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील महत्वाच्या नेत्यांना पक्षात सामावून घेतले जात आहे. काही महिन्यांपूर्वी, अपेक्षित मदत व सहकार्य न मिळाल्याचा आरोप करत, वसंतदादा पाटील यांची नात सून व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. त्या घटनेला अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानले जात होते.

आता भाजपने पुन्हा टायमिंग साधत काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज सरगर यांना आपल्या गोटात आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रवेश ११ ऑगस्ट रोजी होणार असून, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हा निर्णय काँग्रेससह विशाल पाटील यांच्या गटाला आणखी एक राजकीय झटका ठरू शकतो, अशी चर्चा रंगली आहे. शिवाय, भाजपकडून “सोबत या, अन्यथा तुमच्या टीमला पोखरू” असा अप्रत्यक्ष संदेशही दिला जात असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळतोय

एकेकाळी काँग्रेसची मजबूत किल्लेबंदी असलेल्या सांगलीत पक्षाची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत असून, अनेकजण भाजप किंवा जनसुराज्याकडे वळत आहेत. गटबाजीमुळे सक्षम नेत्यांची ताकद मर्यादित झाली आहे, परिणामी स्थानिक निवडणुकांच्या आधीच काँग्रेसची अवस्था आणखी बिकट होण्याची शक्यता वाढली आहे.

धनगर समाजाचा नवा चेहरा भाजपकडे

पक्षातील गटबाजीच्या पार्श्वभूमीवर, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश जवळपास ठरलेला असतानाच, मनोज सरगर यांचा प्रवेशही जाहीर झाला आहे. त्यांच्या आगमनामुळे भाजपला सांगली शहरात धनगर समाजाचा प्रभावी चेहरा मिळणार आहे, ज्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.

गाडगीळ गटाचा बळकटीकरणाचा प्रयत्न

मनोज सरगर यांनी यापूर्वी विशाल पाटील यांच्या लोकसभा प्रचारात जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, आटपाडी आदी भागांत प्रभावी कामगिरी केली होती. मात्र, निधी वितरणात आपली भूमिका न मिळाल्याने ते नाराज होते आणि नंतर भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या संपर्कात आले. गाडगीळ यांनी ही संधी साधत सरगर यांना पक्षात आणले असून, त्यांच्या गटाला यामुळे बळकटी मिळेल.

विशाल पाटील यांना अप्रत्यक्ष इशारा

भाजप नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटील यांना वारंवार पक्ष प्रवेशाची ऑफर दिली होती. मात्र, पाटील यांनी काँग्रेस विचारसरणीशी निष्ठा व्यक्त करत ती नाकारली. त्यानंतर भाजपने जयश्री पाटील यांना आपल्या गोटात घेतले, आता सरगर यांचा प्रवेश होत आहे, आणि जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटीलही वाटेवर आहेत. हे तिन्ही चेहरे विशाल पाटील यांचे निकटवर्तीय असल्याने, भाजपचा संदेश स्पष्ट आहे — “पक्षात या, अन्यथा तुमची टीम आम्ही हळूहळू आपल्या बाजूला खेचू.”