| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. १६ ऑगस्ट २०२५
सामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजना पोहोचाव्यात, त्यांचा लाभ पात्र व गरजूंपर्यंत जलद मिळावा, यासाठी सांगली जिल्ह्यात एक नवा उपक्रम राबविण्यात आला आहे. ‘पालकमंत्री कार्यालय (जीएमओ) हेल्पलाईन’ या नाविन्यपूर्ण सेवेला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हिरवा कंदील दाखवला.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या कार्यक्रमात आमदार सदाभाऊ खोत, डॉ. सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, सत्यजीत देशमुख यांसह जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे व इतर मान्यवर उपस्थित होते.
हेल्पलाईनची वैशिष्ट्ये
समन्वयाचे एकत्र व्यासपीठ : जिल्ह्यातील विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक उत्तरदायित्व निधी यांना जोडून योजनांची अंमलबजावणी गतीमान करणे.
त्वरित समस्या निवारण : जिल्हास्तरावरील तक्रारींवर जलद कार्यवाही व मार्गदर्शन.
सुलभ संवाद : नागरिकांना 8806088064 या क्रमांकावर किंवा helpline@gmosangli.in वर संपर्क करता येणार आहे. तसेच www.gmosangli.in या संकेतस्थळाद्वारेही सहभागी होता येईल.
विशेष कार्य अधिकारी समन्वय : बाळासाहेब यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हेल्पलाईनचे कामकाज होणार आहे.
‘विकसित सांगली’चा संकल्प
“विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित सांगली” या ध्येयाने सुरू झालेल्या या उपक्रमाचा केंद्रबिंदू म्हणजे लोकसहभाग. महिलांच्या आरोग्याची काळजी घेणारा ‘सुखदा’ उपक्रम, विद्यार्थ्यांसाठीची स्कूल कनेक्ट योजना, तसेच सारथी, स्वाधार, सुकन्या समृद्धी यांसारख्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही हेल्पलाईन उपयोगी ठरणार आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, अनेकदा माहितीअभावी पात्र नागरिक योजनांपासून वंचित राहतात. या हेल्पलाईनच्या माध्यमातून अशा लोकांना ओळखून त्यांना आवश्यक कागदपत्रे, मार्गदर्शन व थेट लाभ देण्याची प्रक्रिया सुलभ होईल.
सेवा, सुशासन व जनविश्वास
या उपक्रमातून केवळ समस्या निवारणच नव्हे तर नवीन संधींची निर्मिती, महिलांसाठी रोजगारसंधी, स्वयंसेवकांची निवड आणि नागरिकांना निर्णय प्रक्रियेत थेट सामील करून घेण्याचा प्रयत्न होणार आहे.
“जनतेच्या विश्वासाला प्रतिसाद देण्यासाठी आणि प्रगत सांगलीचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी ही हेल्पलाईन एक प्रभावी समन्वय यंत्रणा ठरेल,” असा विश्वास पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय वरूडकर यांनी केले, तर आभार नरेंद्र यरगट्टीकर यांनी मानले. सूत्रसंचालन विशाल कुलकर्णी यांनी केले.