yuva MAharashtra महायुती सरकारकडून राज्य कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाची भेट; महागाई भत्ता वाढ

महायुती सरकारकडून राज्य कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाची भेट; महागाई भत्ता वाढ

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - मंगळवार दि. १२ ऑगस्ट २०२५

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठा दिलासा जाहीर केला आहे. केंद्राच्या धर्तीवर, राज्यातील महागाई भत्ता (DA) २ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे लाखो कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय जाहीर करत राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ही वाढ १ जानेवारी २०२५ पासून ३१ जुलै २०२५ पर्यंत लागू राहणार असून, आता राज्याचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

या वाढीचा लाभ केवळ राज्यातील कायमस्वरूपी सरकारी अधिकारी व कर्मचारीच नव्हे, तर जिल्हा परिषदेत कार्यरत निमसरकारी कर्मचारी तसेच पात्र पेन्शनधारकांनाही मिळणार आहे. जानेवारी २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीतील महागाई भत्त्याची आठ महिन्यांची थकबाकी लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

केंद्र सरकारने यावर्षी मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५५ टक्क्यांपर्यंत वाढवला होता. आता दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी ३ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असून, ती लागू झाल्यास त्यांचा महागाई भत्ता ५८ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. राज्य सरकारचा हा निर्णय महागाईच्या वाढत्या लाटेत कर्मचाऱ्यांना आर्थिक आधार देणारा ठरणार आहे.