| सांगली समाचार वृत्त |
इस्लामपूर - बुधवार दि. १३ ऑगस्ट २०२५
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर जयंत पाटील आणि "करेक्ट कार्यक्रम" हे जणू समिकरणच. आता ते काहीसे हलके-फुलके झाले आहेत. सात वर्षांच्या सततच्या राज्यभरच्या जबाबदाऱ्यांनंतर खांद्यावरील ओझे कमी झाले आणि त्यांचा मोर्चा थेट इस्लामपूर मतदारसंघ व सांगली जिल्ह्याकडे वळला आहे. ‘निवांतपणाचा’ हा काळ ते विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी आणि स्वतःचा राजकीय गड अधिक मजबूत करण्याच्या तयारीत आहेत.
प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात पाटील यांचे लक्ष संपूर्ण महाराष्ट्रभरच्या संघटनात्मक कामांकडे असल्याने स्थानिक राजकारणात त्यांचा सहभाग तुलनेने कमी झाला होता. त्यामुळे मतदारसंघातील त्यांच्या विविध संस्था, दूध संघ, तसेच कारखान्यांच्या कामांवर त्यांचे लक्ष मर्यादित राहिले. परिणामी मागील विधानसभा निवडणुकीत त्यांना अपेक्षेपेक्षा कडवी लढत द्यावी लागली आणि विरोधक निशिकांत पाटील यांनी त्यांच्या मताधिक्यावर गदा आणली.
महायुतीचा दबाव, पाटलांचा आक्रमक अंदाजनिवडणुकीनंतर महायुतीतील तीनही प्रमुख पक्षांनी इस्लामपूर तालुक्यात संघटनात्मक बळकटी वाढवली. माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह काही नेते अजित पवार गटात गेले, तर अण्णासाहेब डांगे आणि त्यांचे वारस भाजपमध्ये दाखल झाले. या राजकीय हालचालींना पाटील यांनीही रोखठोक प्रतिसाद दिला. त्यांनी स्वपक्षीयांना इशारा देत, “विरोध नसला तर मी शांत असतो; पण एकदा हल्ला सुरू झाला की खरी ताकद दाखवतो” असे सांगत आगामी हालचालींचा धडाकेबाज संकेत दिला.
स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी पूर्वतयारी
आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पक्ष बदलू इच्छिणाऱ्यांनी आताच निर्णय घ्यावा, अन्यथा निवडणुकीच्या तोंडावर ‘बसून करेक्ट कार्यक्रम’ होईल, असा इशारा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. “आता मी मोकळा आहे, कोणी ऐनवेळी फितूर झाला तर थेट कार्यक्रम लावीन,” असे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीसांनाही थेट टोला
स्वतःच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उत्तर देताना पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच सुनावले. “प्रवेशासाठी मी अर्जच दिला नाही. आमदारांची भर घालण्यापेक्षा राज्याच्या कारभाराकडे लक्ष द्या,” असा टोला त्यांनी लगावला होता. तसेच सत्ताधारी पक्षांकडून सध्या विरोधकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी जिल्ह्यातील सर्व नेते भाजपमध्ये कसे बसवणार, हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
सध्याच्या त्यांच्या आक्रमक भाषणशैली, स्वकियांना दिलेला खुला इशारा आणि स्थानिक पातळीवरील सक्रिय मोर्चेबांधणी पाहता, विरोधकांना इस्लामपूरमध्ये सहजगत्या पाय रोवणे आगामी काळात कठीण होईल, हे स्पष्ट दिसत आहे.