| सांगली समाचार वृत्त |
सांगली - बुधवार दि. ३० जुलै २०२५
काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. बुधवारी ते भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. यासंदर्भात आज मुंबईत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह महत्त्वपूर्ण चर्चा केली.
या बैठकीत काही मुद्द्यांवर स्पष्टता आवश्यक असल्याचे पाटील यांनी नमूद केले. दुसरीकडे, काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडूनही त्यांच्याशी थेट संवाद साधून पक्षातच राहण्याचे आवाहन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आमदार विश्वजीत कदम यांच्याशीही त्यांची दीर्घ चर्चा झाली असल्याचे समजते.
सूत्रांच्या माहितीनुसार, पाटील यांना शिंदे गट तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही रसद आहे. गेल्या काही काळात पक्षांतर्गत विश्वासघाताच्या अनुभवामुळे ते अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे.राजकीय समिकरणांमध्ये पुन्हा काँग्रेसमध्येच ठाम राहण्याची शक्यता आहे की ते नवीन पर्याय स्वीकारतील, याचा उलगडा लवकरच होणार आहे. मात्र स्वतः पाटील यांनी कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून आठ दिवसांत अंतिम निर्णय जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत.