| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० मे २०२५
सांगली जिल्ह्यात संभाव्य पूरस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) पथकाने सज्ज राहून दक्षतेने कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले आहेत.
पूरप्रवण भाग, दरडग्रस्त गावं आणि शहरी क्षेत्रातील धोकादायक इमारती यांची प्रत्यक्ष पाहणी करावी. आपत्ती काळात मदत व बचाव कार्य जलद आणि प्रभावीपणे पार पाडण्यासाठी स्थानिक माहिती आधीच गोळा करून ठेवावी, तसेच नागरिकांमध्ये जनजागृतीही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यात दाखल झालेल्या NDRF पथकाशी जिल्हाधिकारी काकडे यांनी संवाद साधला. यावेळी पथक प्रमुख संतोषकुमार तिवारी, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ तसेच पथकातील इतर जवान उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, येणाऱ्या मान्सूनसाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज असून, आपत्कालीन परिस्थितीत NDRF पथकाची भूमिका अत्यंत मोलाची ठरणार आहे. स्थानिक यंत्रणा, पोलीस आणि संबंधित विभागांसोबत योग्य समन्वय ठेवत कामकाज करावे. गरज भासल्यास जिल्हा प्रशासनाच्या सूचनांनुसार तत्काळ मदत कार्य सुरू करावे आणि आवश्यक उपकरणांसह सज्ज राहावे, अशी सूचना त्यांनी केली.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्य सरकारने NDRF पथकाची नियुक्ती केली असून, संभाव्य संकटे टाळण्यासाठी आणि मदत कार्यासाठी हे पथक सांगली जिल्ह्यात कार्यरत राहणार आहे. येणाऱ्या पावसाळ्याच्या काळात पथक आपत्ती व्यवस्थापनासाठी सक्रिय असणार आहे.